मंत्र्यांच्या नावाने राज्यव्यापी पैसे वसुली प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावरुन तपास करावा अन्यथा आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा: शेतकरी कामगार पक्षाची मागणी

गडचिरोली (२० सप्टेंबर): राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या नावाने प्रत्येकी एक लाख रुपये जमा केल्याप्रकरणी आरमोरी पोलीसांनी 9 लाख रुपये जप्ती केल्याच्या प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात असल्याने वरीष्ठ स्तरावरुन चौकशी करुन आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांच्या नावे वसुली करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई रामदास जराते यांनी केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भाई रामदास जराते यांनी म्हटले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ आणि सेवेत कायम करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे राज्याचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालक यांना पैसे द्यायचे आहेत असे सांगून संबंधीत कर्मचारी संघटनेच्या राज्य आणि जिल्हा समन्वकांनी पैसे जमा केले असल्याचा प्रकार राज्यभरात सुरू आहे. दरम्यान आरमोरी येथे पोलिसांनी कारवाई करीत एका कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ९ लाख रुपये जप्त करण्यात आले.मात्र याप्रकरणी तक्रारदार नसल्याचे कारण देत पोलिसांनी सदर प्रकरण थंड बस्त्यात ठेवले असल्याने आरोग्य मंत्र्यांचा खरोखरच हात आहे काय? अशी शंका निर्माण झाली असल्याने या संबंधात वरीष्ठ स्तरावरुन सदर प्रकरणी चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणले जावे, अशी मागणी भाई रामदास जराते यांनी केली आहे.

तसेच याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ई-मेल द्वारे गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि गडचिरोली जिल्हाधिकारी यांना मोबाईलवर वरील संभाषणाचे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत.

याउपरही राज्यव्यापी चौकशी केली जाणार नसेल तर पगार वाढ आणि सेवेत कायम सामावून घेण्याच्या नावाने कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून वसुली केल्या जात असल्याच्या प्रकरणात खरोखरच आरोग्य मंत्र्यांचा सहभाग असल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे पुरोगामी विचारांच्या ठाकरे सरकार मध्ये पदावर राहण्याचा अधिकार आरोग्य मंत्र्यांना राहणार नसून, याप्रकरणी सरकारकडून व्यापक चौकशी केली जावी नाहीतर आरोग्य मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई रामदास जराते, गडचिरोली जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सह चिटणीस भाई रोहिदास कुमरे यांनी केली आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *