राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या: भाई जयंत पाटील

 

परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान

मुंबई( १७ ऑक्टोबर ): परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली.

गेल्या ३ ते ४दिवसांपासून परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजविला. शेतकर्‍यांचे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीसाठी राज्य सरकारला गळ घालत आहेत. शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतीय. राज्यशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहे. पंचनामे तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील वैनगंगा महापूर, मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी उभी राहिल असे ही जयंत पाटील म्हणाले.
देशात आणि राज्यावर आलेले करोनाचे महामारीचे संकट आले त्यानंतर निसर्गचक्रीवादळ पुन्हा परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, धान इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पीकांना कोंब फुटली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद,तूर, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात केज,माजलगाव, परळी तालुक्याला मोठा फटका बसला आहे. पीक काढणीचे काम सुरू असतानाच हा जोरदार पाऊस झाल्याने आता शेतकर्‍यांच्या हाती पीक लागणार नाही. सोयाबीनच्या लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी स्थिती आहे. मागील भाजप सरकारने केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील जुनीच मदत मिळाली नसल्याने आता जगायचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. भंडारा-गडचिरोली-गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भातपीकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर जवळपास १०-१२ दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. धान, सोयाबीन अशा दोन्ही पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला कोंब आणि कपाशीला बुरशी म्हणजे कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या हाती नाही. ज्वारी पिकांचे सुद्धा मातीमोल झाली आहे, असेही आमदार भाई जयंत पाटील म्हणतात.

कोकणातील रायगड आणि पालघरमध्ये भातपीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे धान कापले तरी संकट आणि नाही कापले तरी संकट,अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. शेतकऱ्यांना बांधावर ५० हजार रु हेक्टरी मदत देण्यात यावी. मराठवाड्यातील परिस्थिती फारच गंभीर आहेत. तेथे तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्‍याला मदत मिळेल, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांचे झालेल्या शेत पिकांचे नुकसान पाहता तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *