कापूस खरेदी तात्काळ सुरू करा : अन्यथा शेकाप जिल्हाभरात तीव्र आंदोलन करणार

कापूस खरेदी तात्काळ सुरू करा : अन्यथा शेकाप जिल्हाभरात तीव्र आंदोलन करणार
भाई ॲड.नारायण गोरे यांचा इशारा

माजलगाव,बीड ( २७ ऑक्टोबर): परतीच्या पावसाने निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झालेला असून थोडाफार शिल्लक राहिलेला कापूस विक्री करण्यासाठी शासनाची कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने, शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत असून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लूट करीत आहेत.त्यामुळे शासनाने तात्काळ शासकीय कापूस खरेदी सुरू करावी,अन्यथा शेतकरी कामगार पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती सदस्य भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी दिले आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माजलगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भाई ॲड.नारायण गोळे पाटील यांनी म्हटले आहे की,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्व पिके परतीच्या अवकाळी पावसाने वाहून गेली असून शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झालेला आहे. सोयाबीन जागेवरच उगवले, बाजरीला झाडावरच कोंब फुटले, तुर पावसाने उधळून गेली, फुटलेल्या कापूसाच्या जागेवरच वाती झाल्या तर बोंडे सोडून गेली आहेत.अशा परिस्थितीत शेतकरी पूर्णता कोलमडून पडलेला असताना केंद्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला तयार नाही, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली असली तरी ती शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. शेतकऱ्याने पिकावर भरलेला पीक विमा मंजूर करायला कंपन्या आणि शासन तयार नाही. अशा परिस्थितीत थोडाफार राहिलेला कापूस शेतकरी वेचून आपल्या घरी घेऊन आला असताना त्यास विक्री करण्यासाठी कुठलीही शासकीय बाजारपेठ उपलब्ध नसल्याने खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लुट करत आहेत.

शेतकरी कोलमडून गेलेला असताना देखील शासन कापसाची शासकीय खरेदी सुरू करायला तयार नाही, ही बाब गंभीर स्वरूपाची असून शासनाने तात्काळ कापसाची खरेदी सुरू करुन दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर भाई ॲड. नारायण गोले पाटील, ॲड. ठोसर, विठ्ठल जाधव, दत्ता जाधव, नंदकुमार सराफ, शिवाजी रकटे, वैजनाथ कदम, ॲॅड. बाबासाहेब घोडे, ॲड.अनंत बादाडे, व्यंकटेश खुळे, लहू सोळंके, राहुल सोळंके, राहुल मापाडे, अशोक माळेकर, राम चोरगे, लक्ष्मण लाटे, प्रमोद सोळुंके, सुदाम चव्हाण, सिद्धेश्वर लांडे, सिद्धेश्वर गायकवाड, मुंजा पांचाळ, समाधान पौळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *