अन्यायकारक कृषी विधेयके राज्यात लागू करु नका: आमदार भाई जयंत पाटील

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षातर्फे मागणी

मुंबई (३ डिसेंबर): मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कोणतीही चर्चा न करता तीन शेती आणि चार कामगार विरोधी विधेयके संसदीय संकेतांची पायमल्ली करून बळजबरी पारीत केले आहेत.त्याला देशभरातील शेतकरी आणि कामगार कडाडून विरोध करीत आहेत.त्यामुळे राज्य सरकारने ही विधेयके राज्यात लागू करु नये, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात झालेल्या बैठकीत आमदार भाई जयंत पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

विधानभवन परिसरात पत्रकारांशी याबाबत बोलतांना आमदार भाई जयंत पाटील यांनी म्हटले की, दिल्ली लगतच्या राज्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने या विधेयकांच्या विरोधात दिल्लीच्या मुख्य रस्त्यांवर उतरून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत.राज्यातील शेतकऱ्यांचीही या विधेयकाबाबत तीच विरोधाची भूमिका आहे.त्यामुळे दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने समर्थन दिले पाहिजे आणि सदरचे विधेयके राज्यात लागू करण्यात येवू नये यासाठी येत्या अधिवेशनात सरकारने ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा.शेतकरी कामगार पक्षाच्या या मागणीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असून राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची राज्य सरकारतर्फे नक्कीच काळजी घेतली जाईल असे आश्वासनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती आमदार भाई जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *