पुण्यातील परिस्थिती भयावह : अजित पवारांनी राजीनामा द्यावा

खजिनदार भाई राहुल पोकळे यांची मागणी

पुणे (९ एप्रिल) : पुणे जिल्ह्यात कोविड १९ विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखांवर पोहचलेली असून संपूर्ण जिल्हाभरात कोणत्याही ठिकाणी रुग्णांकरीता बेड उपलब्ध नाहीत.ही परिस्थिती भयावह असून याला जबाबदार सत्ताधारी असून जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे महापौर मुर्लिधर मोहोळ यांनी या नाकर्तेपणा करीता तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी केली आहे.

भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, राज्यातील आघाडी सरकारने दुर्लक्ष तर केंद्रातील मोदी सरकारने सापत्न पणाची वागणूक दिल्याने पुणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर लसींचा तुटवडा निर्माण झाला.रुग्णांची संख्या चिंताजनक पध्दतीने वाढत असताना टेस्ट किटची सुध्दा कमतरता भासू लागली असून या परिस्थितीला केंद्रातील भाजप आणि राज्यातील आघाडी सरकार जबाबदार असल्याची टिका भाई राहुल पोकळे यांनी केली आहे.

कोणतेही नियोजन न करताच पुन्हा एकदा लाॅकडावून लादण्यात येत असून सामान्य कष्टकरी, कामगार माणसाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचे काम सरकारने केले आहे. तर दुसरीकडे लाईटबीलाची सक्त वसूली, मनपाचे विविध टॅक्सेस,शाळांची फि यामध्ये कोणताही दिलासा दिलेला नाही.विकेंड लाॅकडावूनच्या नावाने तर सरकारने टाईमपास फार्म्युला लादला असून जिल्ह्यातील जनतेला यातून कोणताही फायदा होणार नाही.तसेच सर्वसामान्य माणसाला घरात औषधोपचारा शिवाय उपाशी मरण्यासाठी मोकळे सोडल्याची परिस्थिती पुणे शहरासह जिल्ह्यात निर्माण झाली असून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे महापौर मुर्लिधर मोहोळ यांनी पदावर राहून मिरविण्याचे कोणतेही कारण उरले नसल्याने त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षातर्फे भाई राहुल पोकळे यांनी केली आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *