वैदिकांनी गौण बनविलेला बहुजनांचा महान नायक “मारुती”

‘मारुति’ हा शब्द ‘मरुत्’ या शब्दापासून बनला आहे. मरुताचा पुत्र तो ‘मारुति’ होय. मरुताचे वंशापत्य, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. याचा अर्थ मारुती हा मरुताचा पुत्र वा मरुताच्या वंशात जन्माला आलेला पुरुष ठरतो. मारुतीचा मरुताशी जवळचा संबंध आहे. हे यावरून स्पष्ट होते.

मरुत् हा केवळ एक पुरुष नसून तो अनेक जणांचा गण होता. त्यामुळेच ‘मरुत्’ हा शब्द वैदिक वाङ्मयात बहुतेक वेळा बहुवचनात वापरला जातो. मरुतांविषयी वैदिक ग्रंथांनी केलेले काही निर्देश आधी उद्धृत करावेत आणि मग त्यांच्या संबंधी काही विवेचन करावे, असे माझ्या मनात आहे.

या मरुतांच्या संदर्भात वैदिक ग्रंथांनी घेतलेली एक भूमिका आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ग्रंथांनी मरुतांचा परिचय देताना त्यांना वारंवार ‘विश’ किंवा ‘विशः’ असे म्हटलेले आहे. या शब्दांचा अर्थ प्रजा, जनता, सर्वसामान्य लोक असा होतो. ‘विश्’ या शब्दापासून ‘वैश्य’ हा शब्द बनलेला आहे. चार वर्णापैकी तिसरा वर्ण म्हणून तो ज्ञात आहेच. वैदिकांनी देवांमध्येही चातुर्वर्ण्य असल्याचे मानले आहे. बृहस्पती हा ब्राह्मण, इंद्र हा क्षत्रिय आणि मरुत् हे वैश्य असे त्यांचे वर्गीकरण आहे. या सर्व बाबी ध्यानात घेतल्या असता ‘मरुत्’ हा शब्द भारतीय समाजातील सर्वसामान्य जनतेचा निदर्शक आहे, असे म्हणता येते. त्यामुळे मारुती हा प्राचीन काळातील सर्वसामान्य लोकांचा म्हणजे बहुजन समाजाचा एक अत्यंत मातब्बर असा प्रतिनिधी होता, असे म्हणता येते. हा काळ अगदी सिंधू संस्कृतीपर्यंत जातो. तेव्हापासून भारतातील खेड्यापाड्यांतून मारुतीविषयी आत्यंतिक जिव्हाळा आणि अपार आदर आढळतो.

हा आदर म्हणजे आपल्या एका अत्यंत कर्तबगार अशा प्राचीन महापुरुषाविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता म्हणता येईल. तसेच त्याच्यापासून प्रेरणा घेण्याची उत्कट इच्छाही म्हणता येईल.
काळाच्या ओघात मारुतीचे काही प्रमाणात दैवतीकरण करण्यात आले. रामायणात त्याला रामाचा निष्ठावंत भक्त बनविण्यात आले आणि तो राम ब्राह्मण वर्णाच्या हातातील कळसूत्री बाहुले असल्याची वर्णने करण्यात आली. याचा अर्थ पर्यायाने मारुतीला वैदिक परंपरेने आपल्या व्यवस्थेचा एक समर्थक दुवा बनविले. वैदिकांनी मारुतीच्या व्यक्तित्वावर चढविलेली ही पुटे दूर केल्यानंतरच बहुजनांना अस्सल स्वकीय अशा मारुतीचे दर्शन घडू शकेल.

मरुत हे अनेकदा इंद्राचे सहकारी म्हणून येत असले आणि वैदिक वाङ्मयात त्यांचा वैदिक देवतांमध्ये अंतर्भाव करण्यात आला असला, तरी त्यांचा इंद्राबरोबर अनेकदा संघर्ष झाल्याचेही दिसते. राजाला कर देणे हे प्रजेचे कर्तव्य मानले जाते. याच अर्थाने प्रजेला राजाचे अन्न, भक्ष्य वा खाद्य म्हटले जाते. स्वाभाविकच, मरुत हे इंद्राचे अन्न असल्याचा निर्देश वैदिक ग्रंथांतून आढळतो. मरुतांनी इंद्राची अशी ताबेदारी नेहमीच मानली, असे मात्र नाही. त्यांनी इंद्राला कर देण्यास नकार दिल्याचे वर्णन तैत्तिरीय ब्राह्मणाने पुढीलप्रमाणे केले आहे,

“इंद्राची स्वतःची प्रजा असलेल्या मरुतांनी त्याला कर दिला नाही.”

प्रजेविषयी आणि वैश्यांविषयी तुच्छतेचा भाव वैदिक ग्रंथांनी अनेकदा व्यक्त केला आहे. खरे तर, वैदिक व्यवस्थेने वैश्यांना द्विज मानलेले आहे. शूद्रांना जसे वेद, यज्ञ वगैरेंवा अधिकार नाकारून सर्व प्रकारच्या प्रतिष्ठेपासून वंचित करण्यात आलेले होते, तसे वैश्यांच्या बाबतीत करण्यात आले नव्हते. असे असले, तरी समाजातील त्यांचे स्थान ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या बरोबरीचे नव्हते. त्यांच्याकडे एक प्रकारच्या तिरस्कारानेच पाहिले जात होते. याचे अनेक पुरावे वैदिक वाङ्मयात आढळतात. तैत्तिरीय ब्राह्मणाने म्हटले आहे,

“वाजसृतांना (ऋत्विज) सुराग्रह देतो. याद्वारे तो वैश्यांना (प्रजेला) अनृतानेच संयुक्त करतो.” यावर भाष्य करताना सायणाचार्यांनी म्हटले आहे, “ ‘वाजसृत्’ म्हणजे अन्न निर्माण करणारे वैश्य होत. त्यांच्यासाठी सोमरसाने रहित असे सुराग्रह म्हणजे मद्याचे प्याले द्यावेत. मद्याच्या पापरूपत्वामुळे अनृताशी समान असलेल्या आणि जन्माने अधम असलेल्या वैश्यांना (यजमानाने) अनृतानेच युक्त केल्यासारखे होते.”
ज्यांच्या आचरणात मुळात अमृत वा खोटेपणा नाही, त्यांच्या जीवनात मुद्दाम खोटेपणा निर्माण करून त्यांना डाग लावण्याची याज्ञिकांची ही तर्हा किती मनुष्यद्वेष्टी आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वैश्यांचे वर्णन करताना ‘जन्माने अधम’ या अर्थाची शब्दरचना करण्यात आली आहे, हेही लक्षणीय आहे.
मरुतांसाठी ठेवावयाची हविर्द्रव्ये वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवावीत आणि इतर देवतांसाठी असलेली हविर्द्रव्ये उत्तर बाजूला ठेवावीत, असे तैत्तिरीय ब्राह्मणानेच म्हटले आहे. मरुतांना म्हणजेच वैश्यांना दूर ढकलण्याच्या दृष्टीनेच असे करण्यात आले आहे. या ग्रंथांनी पुढे स्पष्टपणे तसे म्हटलेले आहेच, “(ती हविर्द्रव्ये) वैश्यांना ब्राह्मणांपासून आणि क्षत्रियांपासून दुसरीकडे ढकलून देणारी होतात.”
मरुतांविषयी अशा प्रकारचा तिरस्कार असल्यामुळे आणि अनेकदा यज्ञामध्ये त्यांना बरोबरीने वागविले जात नसल्यामुळे त्यांनी यज्ञाला विरोध करणे स्वाभाविकच होते. तैत्तिरीय ब्राह्मणाने म्हटले आहे, “मरुतांनी प्रजापतीच्या यज्ञाचा नाश करण्याची इच्छा केली.” या भाष्य करताना सायणाचार्यांनी म्हटले आहे, “प्रजापतीचा सप्तदशप्रजापतिरूप यज्ञ होता. तो यज्ञ पर्यग्निकरणानंतर नष्ट करण्यास मरुत सज्ज झाले.”

मरुत हे वैदिक व्यवस्थेशी पूर्णपणे समरस झालेले नव्हते, याचा हा स्पष्ट पुरावा आहे. स्वाभाविकच, मारुतीचे कितीही वैदिकीकरण झाल्याचे आज दिसत असले, तरी मारुती हे व्यक्तित्व बहुजन समाजाशीच प्रामुख्याने जोडले गेलेले आहे.

लेखक – डॉ.आ.ह.साळुंखे

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *