बहुजन समाजाला बुध्दीहीन करण्याच्या प्रयत्नाविरुध्द लढा उभारा

भाई संपतराव पवार यांचे तरुणांना आवाहन

मुंबई (९ मे ): सध्या बहुजन समाज एका मोठ्या कात्रीत अडकलेला आहे.बहुजन समाज हा बुध्दीहीन करण्याचा प्रयत्न सुरु झालेला आहे.शैक्षणिक धोरण आणि अवलंबलेल्या तंत्रामुळे सध्याचे वातावरण आता जातीवाचक नव्हे तर बुध्दीहीन विरुद्ध बुध्दीवान असा करण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी आवाज उठवावा आणि लढा उभारावा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते भाई संपतराव पवार यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षातर्फे शेकाप युवा कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबीर अंतर्गत आज शेकाप मध्यवर्ती समीतीचे सदस्य भाई चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत त्यांनी पुरोगामी युवक संघटना काल,आज आणि उद्या या विषयावर युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जलनायक,पाणी चळवळीचे नेते भाई संपतराव पवार म्हणाले,सध्याचा काळ पाहता, आजूबाजूची परिस्थिती विषण्ण करणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती ही समाजामध्ये निर्माण करण्याची या कोरोना कालखंडात तीव्र गरज आहे.अडचणीत सापडलेल्या, संकटात अडकलेल्या माणसाला मदत करणं आणि एक पुरोगामी, कष्टकरी विचारांचा आवाज बुलंद करुन प्रश्न मार्गी लावणं यासाठी युवकांची फ्रंट बलशाली करण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा हा उपक्रम स्वागतार्ह असल्याचे भाई संपतराव पवार म्हणाले.

शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेनंतरचा इतिहास विशद करताना भाई संपतराव पवार म्हणाले,१९६५ मध्ये संघटना स्थापन झाल्यानंतर पक्षाच्या विचारांवर, राज्यातील सत्ताधारींना सळो की पळो करुन सोडले.सीमाप्रश्न, शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे, फी माफी तसेच १९७२ च्या दुष्काळी परिस्थिती या विषयी पुरोगामी विद्यार्थी संघटनेमार्फत आवाज उठवून सरकारला दखल घेण्यास बाध्य केले,प्रसंगी कार्यकर्ते जेलमध्येही गेलोत.याच चळवळीतून पुढे सक्रीय राहून लढा सुरू ठेवल्याने सरकारला समान पाणी वाटप, चारा छावण्या सुरु करण्यासारखे धोरण सरकारला स्विकारावे लागल्याचे भाई संपतराव पवार यांनी सांगितले.

संघटनेला कार्यक्रम न देणे हे संघटना मारण्यासाठी संपविण्यासाठी कारणीभूत आहे. आता नव्या कालखंडात, नव्या वातावरणात नवे तंत्र,नवे मार्ग काढून संगठना बांधणी करीता गेलो पाहिजे.गरजेतून निर्माण झालेली संघटना कधीच संपत नाहीत.त्यासाठी लोकांच्या गरजेवर लढण्याची आवश्यकता असल्याचे मतही भाई संपतराव पवार यांनी मांडले.

व्याख्यानमालेला राज्यभरात उदंड प्रतिसाद

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या युवा नेत्या चित्रलेखा पाटील आणि साम्य कोरडे यांच्या पुढाकाराने शेकाप युवा कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबीर अंतर्गत आयोजित या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेला संपूर्ण राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन झालेल्या थेट प्रक्षेपणाचा हजारो युवक कार्यकर्त्यांनी लाभ घेतला.या व्याख्यानमालेमुळे शेकापच्या विद्यार्थी आणि युवक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *