
कोरोनाच्या सावटाखाली लहान मुलं : तिसऱ्या लाटेपुर्वी उपाययोजना करा
महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रितम म्हात्रे यांची मागणी
पनवेल ( ११ मे ) : कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेने तिसऱ्या लाटेची पूर्व सूचना दिल्याने आगामी काळात नागरिकांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांच्या आरोग्याबाबतीत योग्य उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रितम जनार्दन म्हात्रे यानी केली आहे.
भाई प्रितम म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, रायगडच्या पालकमंत्री, पनवेल महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जगात आणि आपल्या भारत देशात कोरोनाने २०२० सालापासून हाहाकार माजविला आहे. सन २०२० साली सुरुवातीला देशात कोरोनाची पहिली लाट आली होती. पहिल्या लाटेत जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा सामना करावा लागला होता. तर आता २०२१ साली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युवक आणि जेष्ठांना भयंकर त्रास होऊन अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. कुटुंबातील कर्ता गमावल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर तरुणांना सुद्धा या आजारांमध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात अनेक कुटुंबे उध्वस्त झालीत.
आता कोरोनाची देशभरात तिसरी लाट येऊ पाहते. तज्ञ व्यक्तींनी तिसऱ्या लाटेचा त्रास लहान मुले आणि नुकतीच प्रसुती झालेल्या मातांना होणार आहे असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आपण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पूर्व खबरदारी म्हणून लहान मुलांच्या आरोग्य तज्ञांच्या सोबत चर्चा करून त्या प्रकारे आरोग्य यंत्रणेचे योग्य नियोजन करून लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर, ओपीडी सेंटर सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. पनवेल महानगरपालिकेने गंभीरतेने विचार करावा आणि तातडीने ठोस पावले उचलावी अशी सूचना विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी आयुक्तांना केली आहे.