नवे शैक्षणिक धोरण उच्चनिच व्यवस्थेला चालना देणारे : प्रा. डॉ.भाई उमाकांत राठोड यांची टिका

नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदी धोकादायक ठरण्याचा व्याख्यानमालेतील सुर

मुंबई ( १६ मे ) : विज्ञानाधारित शिक्षणाची गरज असतांना मोदी सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर देवधर्म आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अभ्यासक्रम राबवता येतील असे असून गरीब आणि श्रीमंत अशी दरी कायम राहून उच्चनिच व्यवस्था पुन्हा निर्माण होण्यासाठी हे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे,अशी टिका शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.भाई उमाकांत राठोड यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षातर्फे शेकाप युवा कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबीर अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती सदस्य तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत भारताचे नविन शैक्षणिक धोरण आणि परिणाम या विषयावर ते ऑनलाईन व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

प्रा.डाॅ.भाई उमाकांत राठोड म्हणाले,देशाचे नवे शैक्षणिक धोरण आणतांना सरकारने संसदेत कोणतीही चर्चा न करताच केवळ मंत्री मंडळाच्या बैठकीत ठराव करून देशातील जनतेवर लादले गेले आहे.यामुळे गरीब कष्टकरी वर्गातील मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जावून पुर्वीची मनुची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न या धोरणाआडून करण्याचा घाट घातला असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार, शेकाप नेते भाई बाळाराम पाटील म्हणाले, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जीवन आधारित अभ्यासक्रम लागू करण्याच्या नावाखाली आणले आहे.मात्र हे धोरण राबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनी खर्च करण्याविषयी ची आवश्यक तरतूद किंवा व्यवस्था केलेली नाही.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अव्यवस्था निर्माण होण्याची परिस्थिती येईल.

हे नवे धोरण पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही अडचणीचे ठरण्याची भीतीही भाई बाळाराम पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती सदस्य तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाई चंद्रकांत चव्हाण यांनी स्पष्ट केले की, सरकारला देशात आर्थिक विषमता वाढवायची आहे.त्यासाठी कागदावर अत्यंत सुंदर असलेले हे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे.हे धोरण आणतांना मोदी सरकारने भारतीय राज्यघटना आणि त्यातील तरतुदी धाब्यावर बसवून भांडवलशाहीला अभिप्रेत व्यवस्था निर्माणाचा कट रचला आहे.

यातील स्कूल काॅम्प्लेक्स संकल्पनेने तासिका पध्दतीला चालना मिळून विद्यार्थ्यांवर होणारा संस्कारांचा गाभा नष्ट होणार असून सत्ताधारी मोदी सरकारने गुरुकुल आणि जाति व्यवस्थेकडे पुन्हा नेण्याच्या दृष्टीने हे धोरण आणले गेले असून आता चळवळींच्या माध्यमातून हे मनुवादी डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भाई चंद्रकांत चव्हाण यांनी केले.

व्याख्यानमालेचे प्रास्ताविक युवा नेत्या चित्रलेखा पाटील यांनी तर संचालन पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या मुंबई अध्यक्ष साम्या कोरडे यांनी केले.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *