जनतेच्या हक्कांसाठी ‘भाई’ व्हीलचेअरवर पोहचले सभागृहात

 

मुंबई ( ५ जुलै ) : पायाला गंभीर फ्रॅक्चर असल्याने पाच दिवसांपूर्वी ऑपरेशन झालेले असतांना आणि डाॅक्टरांनी दिर्घ विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला असतांनाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, विधान परिषदेचे आमदार भाई जयंत पाटील जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत त्यासाठी संविधानिकरित्या पाठपुरावा करता यावा या पोटतिडकीने व्हीलचेअरवर बसून विधानभवनात पोहोचल्याने ‘विधान भवन’ परिसर अचंबित झाले.

आजपासून महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन सुरू झाले. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन म्हणजे जनतेच्या हिताचे आणि जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारदरबारी मांडण्याची आयती संधीच! शेतकरी कामगार पक्षाला विधिमंडळ कामकाजात सहभागी होण्याचा ऐतिहासिक वारसा. विधिमंडळात पुर्णवेळ उपस्थित राहून कामकाजात सहभागी होण्याचा हा वारसा शेतकरी कामगार पक्षाच्या भाई उद्धवराव पाटील, दत्ता पाटील,दि.बा.पाटील, विठ्ठलराव हांडे गणपतराव देशमुखांसह अनेकांनी सांभाळलेला. त्यात भाई जयंत पाटील यांच्या भाषणाचा व प्रश्नांचा वेगळा दबदबा सभागृहात नेहमीच पहायला मिळतो. जनतेचे विविध महत्त्वाचे प्रश्न ते रोखठोकपणे सभागृहात मांडत असतात व सडेतोडपणे सरकारला जाबही विचारत असतात.

आज दुखरा पाय घेऊन, वॉकरच्या सहाय्याने चालत सभागृहात हजर राहण्याची त्यांनी आग्रही भूमिका घेतली व इतर सदस्यांना अचंबित केले. भाई जयंत पाटील यांच्या वागण्या-बोलण्यातला साधेपणा सर्वांना नेहमीच भावतो.

केवळ राजकीय व्देष, फायद्याचे आणि सत्तासमीकरण टिकविण्यासाठी सभागृहात गदारोळ घालून वेळ वाया घालवणे आणि संविधानिकमुल्य पायदळी तुडविण्याचा प्रकार घडत असल्याचा अनुभव येत असतांना शेतकरी कामगार पक्षाची परंपरा आणि जनतेच्या प्रश्नांप्रती त्यांची असलेली ओढ व ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाई जयंत पाटील यांचा अखंड सुरू असलेला खटाटोप हा प्रेरणादायी आहे. त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात प्रेम आहेच, पण आजच्या त्यांच्या समर्पण भावनेतून केलेल्या कृतीमुळे त्यांच्याबद्दलचा आदरभावही द्विगुणीत झाल्याची भावना सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण झाली आहे.

मराठा आरक्षणावरुन उडालेल्या गोंधळात बारा आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्याची घटना घडलेली असतांनाही व्हीलचेअरवर आलेल्या ‘भाईंची’च चर्चा विधान भवन परिसरात पसरलेली होती.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *