भाई जयंत पाटील : कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांचे ठाम वैचारिक नेतृत्व

७ जुलै १९५५ रोजी प्रभाकर पाटील आणि सुलभाताई पाटील यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांचे नाव ‘जयंत’ ठेवण्यात आले. जयंतभाईंनी पुढे महाराष्ट्राच्या समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला. समृद्ध राजकीय व सामाजिक वारसा लाभलेल्या भाई जयंत पाटलांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात अलिबाग पंचायत समितीचे सदस्य म्हणून केली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर २७ जुलै २००० पासून विधान परिषदेचे आमदार म्हणून ते कार्यरत आहेत ते आजपर्यंत.

राजकारण हा आमचा पैसा कमवण्याचा उद्योग नाही, तर अनेक उद्योगांच्या माध्यमातून कमावलेला पैसाही समाजकारण म्हणून राजकारणात वापरल्याचे भाई रोखठोकपणे सांगतात. मतदारसंघातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ते सरकारला भर सभागृहात धारेवर धरतात. त्यांच्या भाषणाची चर्चा झाली नाही असे विधिमंडळाचे अधिवेशन सापडणे अवघड आहे.

त्यांचे कार्य रायगड जिल्ह्यापुरते मर्यादित नाही. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावागावांत जाऊन त्यांनी तरुणांशी संवाद साधला. दुष्काळ समजून घेतला, त्यानंतर त्यावर उपाय सुचविले. पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते भरीव कार्य करत असतात. त्यानंतर संघर्षशील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाईंच्या नेतृत्वाखाली ४ मार्च २०१६ रोजी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आली आणि त्यांनी दुष्काळग्रस्तांकडे लक्ष दिले. यानंतर दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा ओघही वाढला. या मोर्चाने मराठवाड्यातील जनतेने आमदार भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर शेतकरी, दु:खी, कष्टी लोकांचे नेते म्हणून शिक्कामोर्तब केले.

असाच एक मोर्चा दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थही भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी हजारो कार्यकर्ते व नागरिक रस्त्यावर उतरले व मोर्चा यशस्वी केला. करोनाच्या संकटकाळातही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठे कार्य केले. अलिबागमध्ये त्यांच्या मार्गदर्शनात सुसज्ज करोना सेंटर, ऍम्ब्युलन्स सारख्या सुविधा तसेच ऑक्सिजन प्लांटसाठी सीएसआर फंड उभारणे, घरोघरी अन्नधान्य पोहोचवण्यासारखी कामे झाली.

तरुणाला लाजवेल असा उत्साह, कणखर आवाज, संघर्ष करण्याची तयारी, बेडरपणा, विशिष्ट कार्यशैली व प्रसिद्धीवलयापासून दूर राहून आपले कार्य करत राहण्याची खुबी त्यांचे व्यक्तिमत्त्व विशेष बनवते. त्यांच्या मार्गदर्शनात शेतकरी कामगार पक्ष राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून काम करत रहावा. आ. भाई जयंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हीच सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सदिच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *