ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा

अफवांवर विश्वास ठेवू नका : आमदार भाई जयंत पाटील यांचे आवाहन

सोलापूर (२८ जुलै) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी दिली.

सोलापूर येथील अश्विनी या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. आज भाई जयंत पाटील, सुप्रीयाताई पाटील,प्रा.एस.व्ही.जाधव, कार्यालयीन चिटणीस ॲड राजेंद्र कोरडे  यांनी भाई गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. संबंधित डाॅक्टर आणि परिवारातील सदस्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली असून भाई गणपतराव देशमुख यांच्या तब्येतीशी संबंधित कालपासून येणाऱ्या उलटसुलट बातम्यांवर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि सांगोल्यातील जनतेने विश्वास ठेवू नये,असे आवाहनही भाई जयंत पाटील यांनी केले आहे.

भाई जयंत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, जेष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्यावर हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार सुरू असून, ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बीपी नॉर्मल असून, ते आवश्यक लिक्वीड डाएट घेत आहेत. शारिरीक हालचाल करीत आहेत. भाई गणपतराव देशमुख हे लवकरच पूर्णपणे बरे होऊन परततील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

भाई गणपतराव देशमुखांनी वयाची ९६ वर्षे पूर्ण केली आहेत. या वयातही ते आतापर्यंत मतदारसंघात फिरत होते. जनसामान्यांचे प्रश्‍न तडीस लावून नेत होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पित्ताशयातील खड्यांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे.

आमदार गणपतराव देशमुख हे सलग ५४ वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.

रोजगार हमी मंत्री असताना भाई गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबासारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची डाळिंब उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाटा वाटा आहे. देशातील महिलांसाठीची पहिली सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *