शेतजमीन मालकीच्या बदलातून भांडवलशाहीचे भरणपोषण

भाई चंद्रशेखर नलावडे पाटील

१५व्या शतकाच्या शेवटच्या ३० वर्षात आणि १६व्या शतकाच्या पहिल्या १० वर्षात भांडवलशाही उत्पादन-पद्धतीचा पाया घालणाऱ्या क्रांतीची नांदी म्हटली गेली. सर जेम्स स्टुअर्टने सर्व घरे आणि किल्ले यांत उगीचच निरुपयोगीपणे पडून राहिलेले, असे ज्याचे समर्पक वर्णन केले ते सरंजामदारांच्या आश्रितांचे जथ्थे नष्ट करण्यात आले व त्यामुळे ते कामगारांच्या बाजारपेठेवर प्रचंड संख्येने स्वतंत्र कामगार म्हणून फेकले गेले. भांडवली प्रगतीचाच परिणाम असलेल्या राजसत्तेने एकसुत्री सत्ता मिळवण्याच्या लढ्यात हे जथ्थे सक्तीने व झटपट निर्माण करण्याचे ठरवले. सरंजामदारांनी जेवढे कामगार निर्माण केले, त्यापेक्षा कितीतरी जास्त कामगार भांडवलदारांनी, जमीनीवर सरंजादारांएवढेच सरंजामशाही हक्क असलेल्या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीवरून सक्तीने हाकून देऊन आणि सामुहिक जमीन आपल्या खाजगी मालकीची करून, निर्माण केले.

या क्रांतीमुळे कायदा हादरून गेला, कारण तो संस्कृतीच्या त्या उच्च शिखरावर पोचला नव्हता, जिथे “राष्ट्राची संपत्ती” वेल्थ आॅफ नेशन्स (म्हणजेच भांडवल तयार होणे, बहुसंख्य जनतेची बेदरकारपणे पिळवणूक करणे व त्यांना दारिद्र्यावस्थेत लोटणे) हेच सर्व राज्यकारभार चालवण्याचे अंतिम उद्दिष्ट असते.

बेकन आपल्या ७व्या हेन्रीच्या इतिहासात म्हणतो, “त्या काळात (१४९९) सामुहिक मालकीच्या जमीनीला कुंपण घालून ती आपल्या खाजगी मालकीची करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्यामुळे जनतेचा ऱ्हास झाला.” (भारतात आज येऊ घातलेल्या शेती कंपनीकरणाचा घाट याच कल्पनेची आजची आवृत्ती आहे) कारण भांडवली पद्धतीची अशी गरज असते की बहुसंख्य जनतेची परिस्थिती अत्यंत निकृष्ट आणि जवळपास गुलामीतील अवस्थेत असली पाहिजे. तसेच त्याचे रूपांतर भाडोत्री कामगारांत आणि त्यांच्या श्रमसाधनांचे रूपांतर भांडवलात झाले पाहिजे.

बेकनने स्वतंत्र शेतकरी आणि चांगल्या पायदळ सैनिक यांच्यामधील अन्योन्य संबध दाखवून दिला आहे. तो म्हणतो की, “देशाचा कारभार फक्त सरंजामदार आणि सुखवस्तू लोक यांच्यासाठी चालत असेल आणि उरलेले शेतकरी आणि प्रत्यक्ष नांगर धरणारे हे त्यांचे गडी किंवा नोकर या स्वरूपात असतील किंवा केवळ झोपडीत रहाणारे असतील, तर त्या देशाचे घोडदळ चांगले असेल, परंतु तेथे चांगली व स्थिर पथके अस्तित्वात असणार नाहीत.”

आजच्या काळात याचा संदर्भ लावताना असे म्हणता येईल की, ज्या देशाचा कारभार आधुनिक सरंजामदार म्हणजे भांडवलदार आणि सुखवस्तू लोक म्हणजे उच्च मध्यमवर्गीय, नोकरशहा वगैरे यांच्यासाठीच चालत असेल तर मग याचा बोध होईल तसा या देशाचे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणारी उच्चपदस्थ लष्करी यंत्रणा तर असेल, परंतु प्रत्यक्षात लढणारा सैनिक असणार नाही.

युरोपात कायदा न वापरता किंवा इंग्लंडमध्ये कायदा वापरून जमीनदारांनीच सरंजामी जमीनधारणा पद्धती नष्ट करून टाकली. म्हणजेच, सरकारबाबत त्यांची जी कर्तव्ये होती त्यांतून त्यांनी आपली सूटका करून घेतली. शेतकर्‍यांवर व इतर जनतेवर कर लादून त्यांनी सरकारची ‘नुकसानभरपाई’ केली. ज्या जमीनींवर त्यांना फक्त सरंजामी हक्क हवे होते, त्याऐवजी त्यांनी त्या जमीनींवर आपले आधुनिक खाजगी मालकी हक्क प्रस्थापित करून घेतले, आणि शेवटी त्यांनी जमीन मालकीसंबंधी असे कायदे पास करून घेतले की ज्यांचा थोड्याफार फरकाने ब्रिटीश शेतमजुरांवर तोच परिणाम झाला जो रशियातील शेतकर्‍यांवर टार्टर बोरिस गोड्युनाॅक या फर्मानाने झाला.
या गौरवशाली क्रांतीने वरकड मूल्य आपलेसे करणारे जमीनदार आणि भांडवलदार सत्तेत आल्यानंतर, आतापर्यंत लहान प्रमाणावर होत असलेली शाही जमीनींची चोरी प्रचंड प्रमाणात करून (आपल्याकडे हा प्रकार १९५० नंतर सातारा गादीच्या पुणे व इतरत्रच्या शाही जमीनी लाटण्याच्या उदाहरणात दिसतील) त्यांनी नव्या युगाला प्रारंभ केला. या जमीनी देऊन टाकण्यात आल्या, कवडी किंमतीने विकण्यात आल्या किंवा प्रत्यक्षपणे खाजगी जमीनींना जोडून टाकण्यात आल्या. कायद्याचे थोडेसुद्धा तंत्र न पाळता हे सर्व घडून आले. या क्रियेला पाठिंबा देण्यात भांडवलदारांचे अनेक हेतू होते. त्यात जमीनींच्या बाबतीत खुल्या व्यापाराला प्रोत्साहन देणे, मोठमोठ्या जमीनींवर आधुनिक शेती पद्धतीचे प्रभुत्व स्थापन करणे आणि हाताशी सतत असणार्‍या स्वतंत्र शेतमजुरांच्या संख्येत वाढ करणे हे प्रमुख हेतू होत. शिवाय हे नवीन बँकवाले, नव्याने जन्मलेला भांडवल पुरवणारा वर्ग आणि त्या वेळी संरक्षक जकातीवर अवलंबून असलेले मोठमोठे कारखानदार या सर्वांची आणि नव्याने जन्माला आलेल्या या सरंजामशाहीची, स्वाभाविक मैत्री होती. (अशीच मैत्री युती आपल्याला ब्रिटीश भारताच्या उत्तरार्धात आणि स्वतंत्र भारताच्या पुर्वार्धात आढळते)

केवळ पडित असलेल्या जमीनीच नव्हे तर संयुक्तपणे कसल्या जाणार्‍या किंवा ज्यासाठी समाजाला ठराविक खंड दिला जात असे, अशा जमीनीसुद्धा जवळच्या जमीनदारांनी कुंपण घालण्याच्या नावाखाली आपल्या जमीनीला जोडून टाकल्या. कुंपणे घालण्याचे समर्थन करण्यासाठी लिखाण करणारेसुद्धा हे मान्य करतात की, “या आकसलेल्या खेडेगावामुळे फार्मची मक्तेदारी दृढ होते, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढतात. पडीत जमीनींना कुंपण घालण्यामुळे सुद्धा गरिबांची परिस्थिती जास्त वाईट होते. कारण त्यामुळे काही जीवनावश्यक वस्तू त्यांच्याकडून काढून घेतल्या जातात आणि त्यामुळे आधीच मोठी असलेली शेती मात्र आणखी मोठी होते. डॉ आर प्राइस म्हणतो, “ही जमीन थोड्या बड्या शेतकर्‍यांकडे (किंवा भांडवलदारांकडे कंपनीकरणातून) गेली तर त्याचा हाच परिणाम होणार की लहान शेतकर्‍यांचे रूपांतर, दुसर्‍यासाठी कष्ट करून स्वतःचे पोट भरणाऱ्या आणि म्हणून ज्यांना आवश्यक असणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी बाजाराकडे धाव घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, अशा लोकांच्यात होणार. शहरे आणि उद्योगधंदे वाढतील, कारण जास्तीत जास्त लोक घरासाठी आणि नोकरीसाठी तिकडे हाकलले जातील. शेते एकत्रित करण्याचे परिणाम हेच होतात.” डॉ प्राइस यांच्या विरोधकाचे काय म्हणणे आहे हे पाहु, “आता माणसे मोकळ्या मैदानात व शेतीवर काम करताना दिसत नाहीत याचा अर्थ असा नव्हे की, तशी लोकसंख्या कमी झाली आहे. लहान शेतकर्‍यांचे दुसर्‍यासाठी काम करणार्‍या लोकांच्यात रूपांतर केल्याने जर जास्त काम होत असेल तर ते फायदेशीरच आहे आणि हा फायदा घेण्याची प्रत्येक राष्ट्राची इच्छा असली पाहिजे.”

शेती करणार्‍यांना जमीनीवरून पुर्ण हुसकावून लावण्याची मोठ्या प्रमाणावरची अखेरची क्रिया म्हणजे “शेती मोकळी करणे”.

यापुर्वीही जगात केल्याप्रमाणे ते (भांडवलदार) भांडवली शेतीसाठी जमीन जिंकून घेतील, ही जमीन ते भांडवलाचाच एक भाग करून टाकतील आणि शहरातील कारखानदारीसाठी आवश्यक असणारा स्वतंत्र आणि जातीबाह्य कामगारांचा पुरवठा ते पुन्हा अधिकच निर्माण करतील.

भारतात येऊ घातलेल्या शेती कंपनीकरणाचा प्रवास यापुर्वी युरोपात मळलेल्या अशाच स्वरूपाच्या वाटेवरून होत आहे. आज शेती कंपनीकरणाचे गाजर कितीही आकर्षक आणि गोड भासवले जात आहे, की जे असेच याआधी जागतिकीकरणाच्या बाबतीत दाखवून शेतकर्‍यांना भूतो न भविष्यति अरिष्टात ढकलून देण्याकामी दाखवले गेले, त्यचा तिसरा भाग आहे. आज शेती अरिष्टांची कारणमिमांसा करताना तेव्हाचे जागतिकीकरणाचे समर्थक आज पुन्हा एक दिशाभूल करणारी मांडणी करीत आहेत. अर्थव्यवस्था आणि खुल्या बाजाराचे नियम संचलन हे पुर्णतः भांडवलाच्या मर्जीनेच चालतात याकडे ही मंडळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. परंतु शेती कंपनीकरणाची नवी आकर्षक विषकुपी ही भारतातील शेतकर्‍यांना निर्णायकपणे संपुष्टात आणणाऱ्या शेवटच्या अंकाची आता सुरूवात करेल या कुणीही शंका बाळगू नका.

भाई चंद्रशेखर नलावडे-पाटील
मध्यवर्ती सदस्य: शेतकरी कामगार पक्ष

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *