
लोकनेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे पार्थिवावर सांगोला सूतगिरणीच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
हजारो कार्येकर्ते समर्थकासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांच्या उपस्थित गणपतरावांना अखेरचा लाल सलाम..
सांगोला (३१ जुलै) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विश्वविक्रमी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचा पार्थिव देह अंत्य दर्शनासाठी सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे दुपारी ठेवण्यात आला. यावेळी अंत्य दर्शनासाठी राजकिय लोकप्रतिनिधी सह सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाई गणपतराव देशमुख यांचे शुक्रवार दि. ३० जुलै रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.
विधानसभेवर एकाच मतदारसंघातून ते सर्वाधिक वेळा निवडून आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूरजिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा ते निवडून आले होते.
साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या भाई गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांची सांगोला येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथुन अंत्ययात्रा काढण्यात आली. तर दुपारी १२.४५ पासून घरापासून सुरू झालेली अंत्य यात्रा सूतगिरणी पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. सूतगिरणी वर पोहचताच त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव देह सूतगिरणी येथे ठेवण्यात आला होता.त्यानंतर दुपारी ३ च्या दरम्यान शासनाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.हवेत फैरी झाडून भाई गणपतराव यांना अखेरचा सलाम देण्यात आला. त्यानंतर जेष्ठ चिरंजीव पोपटराव आणि चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते चितेला अग्नी देण्यात आला.
यावेळी आमदार भाई जयंत पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान अवताडे , मा खा राजू शेट्टी, माजी मंत्री राम शिंदे, आ . गोपीचंद पडळकर, मा. आ. दीपक साळुंखे, महादेव जानकर, कल्याणराव काळे, नागेश फाटे, सूतगिरणी चे चेअरमन नानासाहेब लिगाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
अंत्यदर्शनानंतर त्यांच्यावर सूतगिरणी येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चार किलोमीटरपर्यंतची रांगोळी
भाई गणपतरावांना निरोप देण्यासाठी राज्यभरातील शेकापचे कार्यकर्ते व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळी हजर होती. सांगाेलाकरांनी भाई गणपतरावांच्या अंत्ययात्रा मार्गावर साधारण: चार किलोमीटरपर्यंत भावपूर्ण श्रध्दांजली अशा भावना लिहिलेली रांगोळी काढण्यात आली होती. अंत्ययात्रेत अमर रहे..अमर रहे…च्या घोषणा देण्यात आल्या.