जनतेच्या समस्या मांडा, शेकापक्षाचे विचार घराघरात पोहोचवा

माजी आ.पंडितशेट पाटील यांचे आवाहन,वर्धापन दिन साधेपणाने साजरा
माणगाव (२ ऑगस्ट) : शेतकरी कामगार पक्षाने कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसले नाही.मात्र शेकापच्या पाठीत आपण विश्‍वास दाखविलेल्या आपल्याच मित्रांनी खंजीर खुपसल्यामुळे आमदारकीच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापला अपयश आले.शेकाप हा पराभवाला डगमगणारा पक्ष नाही.शेकापला कोणीही संपवू शकणार नाही. येणार्‍या काळात जनतेचे प्रश्‍न,पक्षाची ध्येय धोरणे विचारधारा सर्वत्र पोहचवून समाजात प्रभावीपणे काम करा असे आवाहन माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी माणगाव येथे पक्षाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त माणगाव कुणबी भवन येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आजरोजी माजी आमदार पंडितशेट पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड संकटाचे नियम पाळून आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शेकापचे जेष्ठ नेते अस्लमभाई राऊत,तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे,राजिप सदस्य आरती मोरे,माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे,अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना थोरे पाटील,माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे,जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नामदेव शिंदे,शामराव येलकर, हसनमिया बंदरकर ,तालुका सहचिटणीस राजेश कासारे,माजी उपसरपंच माणगाव अनंता थळकर,सुरव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सखाराम जाधव,मोर्बा माजी सरपंच विलास गोठल,माजी उपसरपंच अमोल मोहिते,देगावचे माजी सरपंच दिनेश गुगळे,इनायत टाके,निजाम फोपळूणकर,ॲड.कौस्तुभ धामणकर,बळीराम खडतर,खरवली उपसरपंच स्वप्नील सकपाळ,नितीन वाघमारे आदी मान्यवरांसह शेकाप कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माजी पंडितशेट पाटील पुढे म्हणाले की. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन झाल्याने महाडला आलो होतो.त्यावेळी रमेश मोरे यांनी माझी भेट घेऊन २ ऑगस्टला शेट आपण माणगावला यायला पाहिजे असा आग्रह धरला. त्यांच्या विनंतीला मान देऊन पक्षाच्या वर्धापनदिनाचे कार्यक्रमाकरिता माणगावला आलो.गेली दोन वर्षे जगावर कोरोनाचे संकट असल्याने आपण पक्षाचा मोठ्याप्रमाणात वर्धापन दिन साजरा करू शकलो नाही.यावर्षी तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून साधेपणात पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतला.

गणपतराव,माणिकराव,मधुशेठ जनसामान्यांचे नेते

गणपतराव देशमुख हे सांगोला मतदार संघाचे ५५ वर्ष आमदार होते.अत्यंत बुद्धिवान माणूस,सभागृहात चालते बोलते विद्यापीठ अशी त्यांची गणना होती.मी आमदार असताना त्यांच्यासमवेत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अंत्ययात्रेला विराट जनसमुदाय उपस्थित होता.स्व.माजी आमदार माणिकराव जगताप हसतमुख व्यक्तिमत्व होते. माझ्या आईच्या निधनानंतर २ वेळा ते मला अलिबागला भेटायला आले होते. दक्षिण रायगडातील समाजात काम करणारे एक तडफदार नेते होते. महाड शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. मागच्या काही निवडणुकात कोणतीही सत्ता नसताना माणिकराव जगताप यांनी ८० ते ९० हजार मते मिळविली होती हि साधी गोष्ट नाही.माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर हे देखील माझ्या जवळचे होते.या तिघांचा सहवास मला लाभला आहे.या सर्वांना पुन्हा एकदा शब्दसुमनाने श्रद्धांजली अर्पण करतो.

शेकाप रायगडाचा खासदार कोणाला करायचे ठरवतो.शेकापने अनंत गीते यांना खासदार केले.तर मागच्या निवडणुकीत तटकरेंना पाठिंबा देऊन खासदार म्हणून निवडून दिल्लीला पाठवले.मात्र शेकापने ज्यांना मित्र म्हणून जवळ करून निवडून आणले त्यांनीच विधानसभा निवडणुकीत शेकापच्या पाठीत खंजीर खुपसला.
मा.आ.पंडित पाटील

शेकापने माणगाव तालुक्यात १९८६ साली भाऊ पवारांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले.ते पक्ष सोडून गेले. स्व.माजी आमदार अशोक साबळे यांना प्रभाकर पाटील यांनी आमदार केले.शेवंता मालोरे यांना जिल्हा परिषदेत सभापती पद दिले. १९९२ साली माणगाव पंचायत समिती शेकापने आपल्या ताब्यात घेतली.शेकाप सोडून गेलेले कोणीच पुढे यशस्वी झाले नाही. शेकाप सोडून आमचा अस्लम राऊत मात्र गेला नाही त्यांना मी धन्यवाद देतो. अशोक साबळे यांच्यानंतर माणगावचा आमदार कोणी झाला नाही याची खंत माणगावकरांना आहे.असेही ते म्हणाले.

शेकापने रायगड जिल्ह्यात हजारो लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे.जिल्हापरिषदेत २२ सदस्य शेकापचे असताना आम्ही अध्यक्षपद घेतले नाही.जिल्ह्यात गनिमी काव्यात आम्ही कमी पडलो. आम्ही ज्यांना कोणाला साथ दिली ती प्रामाणिकपणे दिली.गद्दारी शेकापच्या रक्तात नाही.लोकांसाठी आपण काम केले तर निश्‍चितच लोक आपल्या पाठीशी राहतात असेही त्यांनी सुचित केले.

तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी पहिल्याच निवडणुकीत शतक मारून ५००० मतांच्या फरकाने आरती मोरे जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. रमेश मोरे व निलेश थोरे ही तरुण मंडळी माणगाव तालुक्यात चांगले काम करीत आहे.यांना ताकद देण्याची आवश्यकता आहे.अस पंडित पाटील म्हणाले. पॉस्को कंपनी माणगावची पण याठिकाणी डल्ला मारतोय महाड व रोहावाले. येणार्‍या काळात पॉस्को कंपनीत स्थानिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे यासाठी शेकापतर्फे आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला.

केंद्र व राज्य सरकारने दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन आधीच केले पाहिजे.महाड येथील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.दरड कोसळल्यावर मयत झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ ते ७ लाख रुपयांपर्यंतची मदत केंद्र सरकार व राज्य सरकार देते याचा काय उपयोग असा सवाल पंडितशेट पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रास्ताविकपर मार्गदर्शनात बोलताना तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितल की,विळे-भागाड परिसरातील पॉस्को कंपनीच्या आजूबाजूला जी गावे आहेत तेथील भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठलाही पक्ष काम करताना दिसत नाही.सर्वांचा डोळा तेथील भंगारावर आहे. याठिकाणी शेकाप लक्ष घालून पुढील काळात स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन करेल.आले किती,गेले किती,उडून भरारा,कधी संपणार नाही शेकापचा दरारा असा इशारा मोरे यांनी दिला.यावेळी शेकापचे जेष्ठ नेते शामराव येलकर,जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नामदेव शिंदे,तालुका सरचिटणीस राजेश कासारे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचा माजी आमदार पंडितशेट पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *