उरण – पनवेल मध्ये शेकापक्षाला गतवैभव प्राप्त होणार : आमदार भाई बाळाराम पाटील

७४ व्या वर्धापनदिनी ‘परंपरा संघर्षाची, वज्रमूठ निर्धाराची’ हा संकल्प केला जाहीर

उरण ( २ ऑगस्ट) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण आणि कर्नाळा सहकारी बँक प्रकरणावरून विरोधकांनी शेतकरी कामगार पक्षाला एकटे पाडण्यासाठी बदनामीकारक कट कारस्थाने चालविलेले आहेत.मात्र शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोधकांचे मनसुबे लक्षात आले असून उरण – पनवेल क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाचे गतवैभव येणाऱ्या काळात परत मोठ्या ताकदीने प्राप्त करु,असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.

भाई बाळाराम पाटील म्हणाले, उरण – पनवेल क्षेत्रातील संपूर्ण जिल्हा परिषद गटांमधील कार्यकर्त्यांसोबत सुसंवाद उपक्रम राबविण्यात आला असता कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून विरोधकांनी पसरवलेला भ्रम दूर झाला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागले आहेत.

ज्येष्ठ नेते,भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे शेतकरी कामगार पक्षाचे नुकसान झाले आहे. त्यांचा तत्वनिष्ठ, वैचारिक वारसा पुढे घेऊन वाटचाल करणे हिच आबांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असेही आमदार भाई बाळाराम पाटील म्हणाले.

शेतकरी कामगार पक्षाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात पक्षाचा झेंडा फडकावून साजरा करण्यात आला. तसेच उरण येथील फुंडे हायस्कुल येथे आयोजित वर्धापन दिन मेळावा कोरोना नियमावली पाळून ठराविक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे साहेब, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, जेष्ठ नेते नारायणशेठ घरत साहेब, माजी सभापती काशिनाथ पाटील साहेब, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी,पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेता प्रितम म्हात्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, पनवेल मनपा जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल तालुका चिटणीस श्राजेश केणी, उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, उरण पंचायत समिती सभापती सागर कडू, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ.दत्तात्रय पाटील, महिला आघाडी अध्यक्षा अनुराधा ठोकळ तसेच आजी माजी नगरसेवक, जि. प सदस्य, पं. स सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *