
भांडवलशाहीच्या उन्मत्त गजराजाला काबूत ठेवू पाहणारा माहूत : कार्ल मार्क्स
आईन्स्टाईनचा E=mc2 हा सापेक्षता सिद्धांत जसा कुठल्याही परिस्थितीत भौतिकशास्त्रातून आपणाला खोडता येणार नाही, त्याच प्रमाणे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य, कला ह्या सर्वातून कार्ल मार्क्सला आपण खोडू शकणार नाही. त्याने दिलेल्या मूलभूत सिद्धांतांचा आत्ताच्या परिस्थितीमधील संदर्भ शोधून मानवी जीवनाच्या सुधारणांसाठी वापर करणं अपरिहार्य आहे, पुढे होईल. तुम्ही पुरोगामी असा, मूलतत्त्ववादी असा, राष्ट्रवादी असा, धर्मवादी असा, समाजवादी असा, भांडवलदारी असा कुणीही असाल राजकीय, आर्थिक, सामाजिक धोरण राबवताना तुम्हाला मार्क्सचा विचार करणं भाग पडेल. तशी चिन्हं आता स्पष्टपणे जगभरात दिसून येत आहेत.
प्रत्यक्ष मार्क्सवाद आणि भारतातील मार्क्सवादी साम्यवादाचं स्वरूप, कार्यपद्धती हे एक संपूर्ण स्वतंत्र प्रकरण आहे. भारतात मार्क्सवाद रुजू शकत नाही असा एक अपप्रचार नेहमी केला जातो. वरील विधान पन्नास पंचाहत्तर वर्षांपूर्वी कदाचित योग्य वाटलं असतं. परंतु आजच्या सांप्रदायिक भांडवलशाहीच्या उन्मादिक काळात मार्क्सचा विचार न करणं हे स्वतः वर संकट ओढवून घेतल्यासारखं आहे.
● मार्क्सवाद म्हणजे काय?
मार्क्सवाद……. मार्क्सवाद म्हणजे नेमकं काय आहे? हा प्रश्न ज्यांना पडायला पाहिजे तो नव मध्यमवर्ग भांडवलशाहीने निर्माण केलेल्या चंगळवादात मशगुल आहे. मी ज्याला नवमध्यम वर्ग म्हणतोय तो खरंतर कनिष्ठ मध्यमवर्ग आहे. खाजगी बँकातील कर्मचारी, आयटी सेक्टर मधील इंजिनिअर्स, कॉर्पोरेट एम्प्लॉईज हे सर्व ह्या नवकनिष्ठ मध्यमवर्गात समाविष्ट आहेत. कॉर्पोरेट भांडवलदारानी वरील सर्व घटकांची संघटीत होण्याची, संघर्ष करण्याची शक्तीच काढून घेतली आहे. त्यासाठीच सद्याच्या सत्ताधारी राज्यकर्त्यांचा आणि भांडवलदारांचा खाजगीकरणावर जोर आहे. ह्या नवकनिष्ठ मध्यमवर्गाचा शक्तीपात त्यांना मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराने केला आहे. आपण ज्याला सर्वहारा वर्ग म्हणतो असा शारीरिक कष्ट करणारा शेतकरी, औद्योगिक कामगार, साफसफाई करणारे, वेठबिगारी ह्यांचं शोषण सुरू आहेच. परंतु ह्या नवकनिष्ठ मध्यमवर्गाचं सुद्धा शोषण सुरू आहे. हा वर्ग बूर्ज्वा (नवश्रीमंत वर्ग) होण्याचं स्वप्न पाहू लागला आहे. ह्या वर्गालाच मार्क्सची ओळख होणे महत्वाचं आणि गरजेचं आहे. भांडवलशाही मध्यमवर्गासमोर आर्थिक सुबत्तेचं, आर्थिक सुलभीकरणाचं एक आकर्षक चित्र उभा करत आहे. पण ते फसवं आहे. असं म्हणता येईल की शोषणाची पद्धत बदलली आहे. अलिकडे आपण नेहमी ऐकतो की समाज बदलला आहे, नात्यांपेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे वगैरे वगैरे. मार्क्सने ह्या गोष्टींची पाऊणे दोनशे वर्षांपूर्वी योग्य मीमांसा केली आहे. तो लिहितो, ‘ समाजात निर्माण होणारी नवी आर्थिक परिस्थिती
नात्यांचं भावनिक स्वरूप बदलून आर्थिक नातेसंबंधात परावर्तित होते.’ खेड्यातून शहराकडे, शहरातून मेट्रोज् कडे, मेट्रोज् मधून ॲबरॉडकडे सरकणारा तरुण वर्ग कुटुंबापासून कसा दूर होत चालला आहे, हे गेल्या वीस वर्षातील चित्र आपण अनुभवतोय. मार्क्सची निरिक्षणं, तार्किक विचार, जीवनाशी निगडित सर्व क्षेत्रांचं सूक्ष्म विश्लेषण, त्यावर आधारित सिद्धांत, निष्कर्ष हे आजही लागू होतात. सवाल असा निर्माण होतो की त्याचं नेमकं म्हणनं काय आहे? त्याला काय पाहिजे? थोडक्यात सांगायचं झालं तर मार्क्सला सर्वहारा, कामगार, शेतकरी,. शोषित, पिडीत, कनिष्ठ मध्यमवर्गाची मुक्ती (emancipation) हवी आहे. त्यासाठी त्यानं अंगठा बाद होवू पर्यंत लिहिलं आहे. ह्या लिखाणासाठी, त्याच्या संघर्षासाठी त्याला त्याच्या जीवाभावाच्या मित्रानं म्हणजे फ्रेडरिक एंजेल्सनी मार्क्सच्या मरणापर्यंत आणि मरणोत्तर ही अखंड साथ दिली. म्हणूनच जगभरात बऱ्याच ठिकाणी दोघांचे एकत्र पुतळे आहेत.
● साम्यवाद्यांचा जाहीरनामा
कामगार , सर्वहारा आणि एकूणच मानवाला शोषण, अन्यायाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ह्या दोघांनी लिहिलेल्या The Communist Manifesto म्हणजे साम्यवाद्यांचा जाहीरनाम्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मी सद्या हा मॅनिफेस्टो वाचतोय. माझ्या सवयीप्रमाणे महत्वाच्या मुद्द्यांना पेन्सिलने अंडरलाईन, ब्रॅकेट करु लागलो तर प्रत्येक पानावरील वाक्यनवाक्य अंडरलाईन होत चाललं आहे. ही गोष्ट मी जेष्ठ लेखक, विचारवंत जी.के. ऐनापुरे सरांशी शेअर केली. तर ते त्यांच्या खास शैलीत हसले. त्यांनी सांगितलं की ह्या निव्वळ ऐंशी पानांच्या जाहीरनाम्यावर जगभरात हजारो पुस्तक लिहिली गेली आहेत. त्यापैकी सद्या टेरी इगिल्टन आणि साल्वो जिझेक हे दोन तत्त्वज्ञ महत्वाचे मानले जातात. ह्या जाहीरनाम्याच्या मार्फतच त्यांनी कामगार वर्गाला भावनिक आव्हान केलं की, ‘ संघर्ष करा, आपणाकडे हरण्यासाठी ह्या साखळदंडा शिवाय दुसरे काहीही नाही.’
● भौतिकवादी तत्त्वज्ञान
मार्क्सने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात मोठी भर घातली ती गत्यात्मक किंवा द्वंद्वात्मक भौतिकवाद आणि ऐतिहासिक भौतिकवाद ह्या दोन संकल्पनांना जन्म देवून. ह्या अगोदरच्या भौतिकवादाचा संपूर्ण कायापालट ह्या नवीन संकल्पनेमूळे झाला. ह्याच संकल्पनेत संख्यात्मक बदलांकडून गुणात्मक बदलांकडे कसं जाता येईल ह्याचा उपाय ही मार्क्सने सांगितला आहे. भौतिकवादी तत्त्वज्ञान मांडताना त्याने धर्मचिकित्सा केली आणि ‘ धर्म हा लोकांसाठी अफूची गोळी आहे’ असं जाहीर केलं.
● अर्थशास्त्र
मार्क्सने अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा दास कॅपिटल हा ग्रंथ लिहून एक नवीन क्रांती घडवून आणली. अर्थव्यवस्थेत भांडवल कसं निर्माण होतं? भांडवल ही नेमकी काय संकल्पना आहे? ह्याचं शास्त्रोक्त विश्लेषण त्यानं ह्या ग्रंथात केलं आहे. उत्पादन साधनं, श्रम, नफा, बाजारपेठ, मागणी-पुरवठा ह्या सर्व घटकांचा भांडवल निर्मिती मध्ये कसा उपयोग होतो, त्याची सूत्रं काय असतात, त्याचा शोषणाशी कसा संबंध असतो ह्याचं सुस्पष्ट विवेचन ह्या ग्रंथात मार्क्सने केले आहे. अमेरिका किंवा भांडवलशाहीचा स्वीकार केलेला कुठलाही देश जो पराकोटीचा मार्क्स विरोधी आहे. आर्थिक संकटात चोरुन का होईना दास कॅपिटल उघडतात. एक रिपोर्ट असा आहे की, अमेरिकेत मंदीच्या काळात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असताना तिथला तरुण वर्ग कम्युनिस्ट मॅनिफेस्टोकडे आकर्षित झाला.
आपण पाहिलं कामगार, शेतकरी ह्या सर्वहारा वर्गासाठीचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असेल, जीवन विषयक तत्त्वज्ञानातील द्वंद्वात्मक भौतिकवाद आणि ऐतिहासिक भौतिकवाद ह्या दोन संकल्पना असतील, अर्थशास्त्रातील भांडवल संकल्पनेविषयी विचार असतील मार्क्सने विपुल लिखाण केले आहे. ह्याबरोबरच एंजेल्ससोबत ‘ साहित्य आणि कला’ क्षेत्रावर प्रकाश टाकला आहे.
साहित्य आणि कला क्षेत्रातील सौंदर्य तत्त्वाची नव्याने मांडणी केली आहे. साहित्यिक मूल्यांना नवा अर्थ प्राप्त करुन देणारे सिद्धांत मांडले आहेत. युरोपात मार्क्स अगोदरही मोठी तत्त्वज्ञानाची , चिंतनाची परंपरा होती. मग मार्क्सच जगभर का विस्तारला? ह्याचं कारण त्यानं आपल्या तत्त्वज्ञानाला सैद्धांतिक पातळीवर न ठेवता त्या तत्त्वज्ञानाला कृतिशीलतेची जोड दिली. ह्या दोघांनी जगभरातील कामगारांना संघटीत व्हायचं आव्हान केलं. त्यांच्या समोर ‘राजकीय सत्तेचं महास्वप्न’ ठेवलं. त्यांना जाग आणली. जवाहरलाल नेहरूंनी
त्यांच्या ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ह्या पुस्तकात मार्क्सबद्दल एक मार्मिक निरिक्षण नोंदवून ठेवलं आहे. ते म्हणतात ‘कार्ल मार्क्स हा काही निव्वळ तात्विक सिद्धांताची बौद्धिक चर्चा करणारा कुणी गूढवादी तत्त्वज्ञ किंवा प्राध्यापक नव्हता. तो तत्वज्ञ तर होताच पण व्यवहार कुशल कार्यकर्तासुद्धा होता. त्याची विशेष पद्धती म्हणजे शास्त्रीय संशोधनाचे तंत्र राजकीय आर्थिक प्रश्नांचा विचार करतानाही उपयोगात आणायचे आणि जगातील दुःखावर त्या रीतीने उपाय शोधून काढावयाचे.’ नेहरूंच्या ह्या उद् गारांबरोबर डॉ. आंबेडकरांचा मार्क्स विषयीचा दृष्टीकोण पाहणं हे ही खूप महत्वाचे आहे. आंबेडकरांचा मार्क्सच्या काही मूलभूत विचारांना तत्वतः हा विरोध होता पण आंबेडकरांना मार्क्स मान्य नव्हता किंवा त्यांनी मार्क्स खोडून काढला हा अपप्रचार धादांत खोटा आहे. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबेनी आपल्या मार्क्स आणि आंबेडकर या ग्रंथात उपरोक्त विचार अतिशय समर्पक रीतीने मांडला आहे. आंबेडकरांनी म्हटलं आहे की गौतम बुद्धाची या जगाच्या पाठीवर जर कुणाशी तुलना होऊ शकत असेल तर फक्त कार्ल मार्क्सशी ! हे विधान करताना आंबेडकरांनी कोणताही आतातायीपणा, अतिशयोक्ती केलेली नाही हे खरं. या दोघांचाही भर सैद्धांतिक तत्त्वज्ञानाच्या मांडणी बरोबरच प्रत्यक्ष कृतीवर आहे, हे बुद्ध-मार्क्स च्या तुलनेतील समान सूत्र आहे.
● मार्क्सवादाची निकड
भांडवलशाही आत्ता एका परमोच्च शिखरावर स्थित आहे. तिचं मुख्य शस्त्र असणाऱ्या तंत्रज्ञानानं मानवी आयुष्यात फाजील शिरकाव केला आहे. मोबाईलचे उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की एका बाजूला आपल्याला वाटेल की ही एक मोठी वैज्ञानिक क्रांती आहे पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ही क्रांती भांडवलदारांसाठी भांडवल निर्मितीचं मोठे साधन आहे. हँडसेट आणि कनेक्शन (सिमकार्ड ) त्याचे अतिरेकी उत्पादन काय परिणाम करत आहे हे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. लहान मुलं मोबाईलवर काही लावल्याशिवाय जेवत नाहीत किंवा मोबाईल एडिक्शन वर खात्रीशीर उपाय करुन मिळेल, असे बोर्ड पाहायला मिळत आहेत. भांडवलशाहीत भांडवलाची प्रचंड निर्मिती करण्याचं सामर्थ्य असतं त्यासाठी नैतिक मूल्यांचा कुठल्याही पातळीवर जाऊन ऱ्हास होत असतो. स्पर्धा हे तर तिचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मार्क्सचा भौतिकवाद हेच सांगतो की भौतिक वस्तूंचा, परिस्थितीचा परिणाम आपल्या मनावर होत असतो आणि मन बदलत जाते. स्पर्धा द्वेष, मत्सर आणि खुन्नस वाढवते. संपूर्ण समाजावर त्याचा अंमल राहतो. संपूर्ण समाजाच या स्पर्धेला बळी पडत असतो. नफेखोरी हा स्वभाव होत जातो. संपत्तीचे केंद्रीकरण होत जातं. विषमतेची दरी वाढते. भारताचा विचार केला तर वरकरणी लोकशाही असल्याचा भास होईल. आर्थिक स्वायत्तता असल्याचा भास होईल परंतु इथं खऱ्या अर्थाने भांडवलशाहीच नांदत आहे आणि आता तर ती धार्मिक अधिष्ठान असलेल्या सरकार सोबत काम करत आहे. म्हणजे पुन्हा शेठजी- भटजीचं राज्य आहे असं म्हणता येईल. यांनी निर्माण केलेल्या विकास या स्वप्नमय, मृगजळी संकल्पनेचं प्रयोजन कोणासाठी हा महत्त्वाचा सवाल आहे. या देशावर कम्युनिस्टांचं राज्य येऊ दे असं म्हणणं भाबडेपणाचे होईल, पण मार्क्सवादाचा विचार न करता पुढे जाणं थोडं मुश्कील दिसतंय. भारतासारख्या बहुधर्मीय, बहुभाषी, समाजवादी लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या परंतु आता फॅसीझमकडे निघालेल्या देशात मार्क्स रूजवायचं, हे मोठं कठीण काम आहे. निदान तसा या परिस्थितीत समज झाला आहे. कारण त्याला कुठल्या जातीत, धर्मात कोंबायचं, कुठल्या प्रांतीय वर्चस्वाचा त्याला अधिपती समजायचं, जिथे वर्ग जाणीवच नष्ट झाली आहे तिथे त्याला कुठल्या वर्गाचा तारणहार मानायचं. हा काही भावनिक आव्हान करण्याचा मुद्दा नव्हे परंतु जाती, धर्म आणि वर्गाच्या कक्षा भेदू पाहणाऱ्या सुशिक्षित तरुणांनी मार्क्स जरूर वाचला पाहिजे. आत्मसात करणं सोपं नसलं तरी निदान हे जग काय आहे, जग कसं असलं पाहिजे ह्या विचारासाठी मार्क्स वाचलाच पाहिजे. हा लेख लिहिण्यामागे त्याला गौरविण्याचा, त्याची व्यक्ती म्हणून पुजा बांधण्याचा, आरत्या करण्याचा अजिबात हेतू नाही. त्याने दिलेली तत्त्वं, विचार आसपासचे दुःख कमी करण्यास कामी येवोत एव्हढीच अपेक्षा आहे. त्यासाठीच हे श्रम !
लाल सलाम.
साभार : राहुल सूर्यवंशी, सांगली.