लोह खाणी तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा दिला इशारा

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूची अंतर्गत समाविष्ठ असलेला क्षेत्र असून या क्षेत्रात लागू असलेला पेसा कायद्याच्या तरतूदीचा भंग करुन बेकायदेशिरपणे प्रस्तावित व मंजूर केलेल्या लोह खाणी तातडीने रद्द करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करु. असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.

भारतीय खाण ब्युरोच्या महानियंत्रकांना पाठविलेल्या तक्रारीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील खाणींच्या विरोधात स्थानिक वैधानिक ग्रामसभांनी आणि आदिवासी जनतेने प्रखर आंदोलने, मोर्चे , निवेदने, ठराव केलेले असून वेळोवेळी शासनाला सादर केलेले आहेत.स्थानिकांच्या या वैधानिक आणि संविधानिक भूमिकेला आमच्या शेतकरी कामगार पक्षाने आणि आम्ही नेहमीच समर्थन दिले असून यासंबंधाने आम्ही वेळोवेळी पत्र, निवेदने, तकारी शासनाकडे सादर केलेले आहेत, हे शासनास माहित असूनही शासनाने सदर लोहखाणी कायमस्वरुपी रद्द न करता उलट बळजबरीने स्थानिकांना आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याना यूएपीए ॲक्ट, ११०, ३५३ यासारखे कलमे आणि कायद्याचा धाक दाखवून, पोलिस बळाचा वापर करुन सुरजागड सह विविध ठिकाणी लोह खाणी खोदण्याचे प्रयत्न करीत आहात. असा गंभीर आरोप भाई रामदास जराते यांनी केला आहे.

सुरजागड येथील बळजबरीने खोदण्यात येत असलेल्या लोह खाणीच्या १० दशलक्ष टन प्रती वर्ष उत्खननाला नुकतीच दिलेली परवानगी ही बळजबरी आणि बेकायदेशिरपणाचा कळस गाठणारी बाब आहे. ग्रामसभांची नसलेली परवानगी, खाणी करीता हेडरी ते खाणकामापर्यंत मोठ्या झाडांचे जंगल कापून केलेला रस्ता, त्याकरीता वनविभागाने नोंदविलेला गुन्हा, ग्रामसभांना मिळालेले सामुहिक जंगलाच्या अधिकाराचा पट्टा, सध्या सुरु असलेल्या वाहतुकीमुळे होत असलेले अपघात, खाणीचा कॅपटिव्ह मायनिंगचा बदलविलेला दर्जा, राज्याच्या विधानसभा व विधानपरिषद सभागृहात अनेकदा सुरजागड लोह खाणी विरोधात झालेली चर्चा अशा अनेक बाबींकडे आपण सोईस्करपणे दुर्लक्ष करुन सुरजागड येथे मे. लॉयड्स मेटल ॲन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीला परवानग्या देण्याचे धाडस करुन पेसा, वनहक्क, जैविक विविधता, पर्यावरण, वनसंवर्धन, खाण व खनिज अधिनियमांचे उल्लंघन का करीत आहात, हे आम्हाला अजूनही कळलेले नाही.अशी खोचक टीकाही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

लोह खाणींना ज्या क्षेत्रात आपण मंजूरी देत आहात तिथे भारतातील अत्यंत अतिअसूरक्षीत गणल्या जाणारी माडिया गोंड जमात आदिम काळापासून वास्तव्यास असून या आदिम जमातीचे वसतीस्थान आणि सांस्कृतिक अस्तित्व या बेकायदेशिरपणे खोदल्या जाणाऱ्या खाणींमुळे धोक्यात आले आहे. जागतिक पातळीवरील पर्यावरणाचा वाढता धोका लक्षात घेता आमच्या जिल्ह्यातील वनसंपदेच्या रक्षणासाठी आणि भारताच्या संविधानाने आदिवासी इलाख्यात शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी पाचव्या अनुसूची अंतर्गत केलेली तरतुदीच्या हक्क आणि अधिकारासाठी आम्ही सजग असून गडचिरोली जिल्ह्यात बळजरीने खोदल्या जाणाऱ्या खाणींकरीता आम्ही शासनाचा जाहिरपणे निषेध करीत असल्याचेही आपल्या पत्रात भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे.

तसेच सुरजागड येथे मे. लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड, मे. गोपानी आयर्न यांना मंजूर केलेल्या लोहखाणी तातडीने रद्द करण्यात याव्यात. सुरजागड पासून अंदाजे २० किलोमिटर अंतरावर नव्याने प्रस्तावित करुन जाहीर निविदेव्दारे नेचरल रिसोरसेस, युनिवर्सल सर्विसेस, ओम साईराम स्टील, जेएसडब्लू स्टील लिमिटेड, सनफ्लाग स्टील या कपन्यांकरीता सहा ठिकाणी लोहखाणी करीता लिज देण्याचे प्रयत्न करीत आहात, त्या सर्व सहाही लोहखाणी तातडीने रद्द करण्यात याव्यात. अशी प्रमुख मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय खाण सचिव, उप खाण नियंत्रक आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांनाही सदर पत्राची प्रत शेतकरी कामगार पक्षातर्फे पाठविण्यात आली आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *