भाई भाऊसाहेब राऊत

भारतीय कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य थोर नेते म्हणजे राजाराम बाळकृष्ण उर्फ भाऊसाहेब राऊत हे होत . मुंबईमध्ये परंपरागत ऐश्वर्य संपन्न अशी जी मोजकी घराणी होती त्यातील गिरगावातील राऊत घराणे होय.अशा या धनसंपन्न कुटुंबात १९ फेब्रुवारी १९०४ रोजी भाऊसाहेबांचा जन्म झाला. घरातील सुसंस्कृत वातावरणात आणि करडी शिस्त यात भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. जीवनात सुख असतानासुद्धा ते त्यामध्ये रमले नाहीत. त्यांनी आपले जीवन समाजोद्धार व क्रांतिकारी राजकारणात झोकून दिले . १९३५ मध्ये भाऊसाहेबांनी माथेरान ( कर्जत ) येथे एक छोटा बंगला विकत घेतला. तेथे ते अधूनमधून सहकुटुंब जात असत. माथेरानमध्ये त्यावेळी मुंबईतील श्रीमंत पारशांचे वर्चस्व होते . येथील नगरपालिकासुद्धा पारशांच्या हाती होती . भाऊसाहेबना हे शल्य सारखे टोचत होते. भाऊसाहेबांना येथील गरीब, आदिवासी, मागासलेल्या समाजाबद्दल सहानुभूती निर्माण झाली. त्यातून त्यांनी अशा भूमीपुत्राची एक भक्कम संघटना उभारली . १९४२ च्या आंदोलनातील भाई कोतवाल, गोपाळराव शिंदे सारखे तरूण निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले. अशातूनच त्यांनी पारशींच्या ताब्यात असलेली नगरपालिका सन १९३८ मध्ये भूमीपुत्रांच्या ताब्यात आणली. गोपाळराव शिंदे या माळी समाजातील कार्यकर्त्याला त्यांनी येथे नगराध्यक्ष म्हणून नियुक्त केले.  भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे कार्य उल्लेखनीय स्वरूपाचे आहे . 

सावकारशाहीला आळा 
कर्जत तालुक्यात सावकारांचे प्रस्थ वाढले होते. या सावकारांच्या मनमानीपणाला दडपशाहीला सर्वसामान्य शेतकरी कंटाळले होते. या जनतेच्या छळवणूकीविरूद्ध सावकाराच्या विरोधात जनतेला उभे करण्याचे कार्य भाऊसाहेबांनी केले.या भागातील शेतकऱ्यांचे संघटन केले व त्यांचा स्वाभिमान जागृत केला. त्यामुळे हळूहळू कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सावकाराविरूद्ध भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली आक्रमक पवित्रा घेऊन आपल्या न्याय्य हक्कासाठी प्रखरपणे लढा दिला.
 
राजकीय प्रवास 
भाऊसाहेबांच्या राजकीय प्रवासास सुरूवात खऱ्या अर्थाने सन १९४२ च्या आंदोलनापासून झाली. या आंदोलनात त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी सदस्य म्हणून मोलाची कामगिरी पार पाडली होती. कोळी समाज संघटनेच्या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल व कोळी समाज परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य त्यांनी केले. ‘ स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्याच सन १९४७ ते ४८ च्या विधानसभा निवडणूकीत मुंबई विधानसभेमध्ये ते निवडून गेले . यावेळी काँग्रेसला बहुमत मिळाले होते. परंतु बाळासाहेब खेर व मोरारजी देसाई यांच्या सरकारने जनतेला निवडणूकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार दत्ता देशमुख, भाई सथ्या आदि पुढाऱ्यांना त्यांनी तुरूंगात डांबलेले होते. अशा वेळी भाऊसाहेबांनी खेर, मोरारजी मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची मागणी केली. तथापि खेरानी भाऊसाहेबांना तुम्हीच का राजीनामा देत नाहीत? असा सवाल करताच भाऊसाहेबांनी एका फटकाऱ्यात आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला व आपला स्वाभिमान टिकविला. भाऊसाहेबांच्या राजीनाम्याने रिकामे झालेल्या या जागेसाठी शेतकरी कामगार पक्षाने त्यांनाच परत उमेदवारी दिली. सन १९४९ मध्ये ते पुन्हा निवडून आले.
 
शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत पुढाकार
खेर , मोरारजी मंत्री मंडळाच्या जनताविरोधी कारवाया हाणून पाडण्यासाठी काँग्रेसअंतर्गत शेतकरी कामगार संघ स्थापन करण्यात आला होता. हा संघ स्थापन करताना यशवंतराव चव्हाण सुद्धा भाऊसाहेबांच्या बरोबर होते. परंतु काही दिवसात यशवंतराव चव्हाण यांनी आपली मुळ भूमिका सोडून देऊन काँग्रेस अंतर्गत अशा स्वतंत्र पक्षाची गरज नाही असा सुर लावला. त्यामुळे भाऊसाहेब राऊत व शंकरराव मोरे यांनी पुढाकार घेऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली . पक्षाची स्थापना केल्यानंतर तो वाढविण्यामध्येही त्यांनी संपुर्ण आयुष्य घालविले . १९५२ ची पहिली लोकसभा निवडणूक व भाऊसाहेब सन १९५२ मध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेसच्या चिंतामणराव देशमुखां सारख्या नेत्याविरूद्ध कुलाब्यातून भाऊसाहेबांना उमेदवारी दिली भाऊसाहेबांची अफाट लोकप्रियता पाहून काँग्रेसने धसका घेतला. या मतदारसंघात पंडित नेहरूंच्या अनेक सभा चितामणरावांसाठी घेतल्या . त्याचा प्रभाव म्हणून शेवटी या निवडणूकीत भाऊसाहेब पराभूत झाले. पण सन १९५४ च्या राज्यसभेच्या निवडणूकीत विरोधी पक्षासाठी दोन जागा सोडल्या होत्या. त्या जागेसाठी महाराष्ट्रातून डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब हे दोन उमेदवार निवडुन गेले. 
 
गोवा व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भुमिका 
सन १९५५ मध्ये गोवा व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने अधिक व्यापक प्रभाव निर्माण केला. यावेळी कम्युनिष्ट पक्षाने कामगार मैदान मुंबई येथे प्रचंड निषेध आंदोलन केले. कॉ.डांगे त्याचे प्रमुख होते. पुढे ७ नोव्हेंबर १९५५ रोजी भाऊसाहेबांच्या फणसवाडीतील कोळीवाडीत दक्षिण मुंबई नागरिक परिषदेत मोठे अधिवेशन झाले. त्याच्या नियोजनामध्ये भाऊसाहेबांचा मोठा वाटा होता. यावेळी विधानसभेत मोरारजीनी मांडलेला त्रिराज्याचा ठराव जनतेने उधळून लावला. प्रजासमाजवाद्यांनी हिंसक आंदोलनाचा धसका घेऊन कृती समिती बरखास्त करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी लालजी पेंडसे आणि भाऊसाहेब राऊत यांनी सर्व डावे पक्ष व ट्रेड युनियन्सच्या पुढाऱ्यांची बैठक घेऊन कॉ.डांगे, एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वात आंदोलन पुढे नेण्याची विनंती केली. संयुक्त महराष्ट्र पूरक समिती निर्माण झाली. या पूरक समितीच्या नेत्यांची नाशिक तुरूंगात रवानगी झाली. शेवटी संयुक्त महाराष्ट्र मिळाला. महाराष्ट्र निर्मितीचे मुख्य श्रेय डाव्या पक्षांच्या मोहिमेला द्यावे लागेल. या डाव्या पक्षांना भाऊसाहेबांनीच संयुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेत आणले हे भाऊसाहेबांचे राजकीय कार्य अनन्यसाधारण आहे.
 
  • शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ 
सन १९५७-५८ मध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आल्यावर त्यांनी विरोधी पक्षाच्या एकेक नेत्याला काँग्रेसमध्ये आकर्षित करून घेण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यापासून भाऊसाहेब राऊत दूरच राहिले. त्यांनी कोणत्याही प्रलोभनाला मानले नाही व ते शेतकरी कामगार पक्षातच राहिले. त्यांनी आपल्या मार्क्सवादी ध्येयधोरणाशी प्रतारणा केली नाही. हे त्यांचे राजकीय कार्य महत्त्वाचे होते .सन १९५७ ची लोकसभा निवडणूक व भाऊसाहेब राऊत सन १९५७ च्या सार्वत्रिक निवडणूकीत पश्चिम महाराष्ट्र समितीने काँग्रेसचे पानिपत केले . यावेळी भाऊसाहेब राऊत प्रंचड मताधिक्क्याने लोकसभेवर कुलाबा मतदार संघातून निवडून गेले. ते शे.का.पक्षाचे पहिले खासदार होते.ते खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मुंबईतील परळच्या कामगार मैदानावर त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना ५० ते ६० हजार रूपयांची थैली लोकांनी दिली. त्यावेळी त्यांना ५० ते ६० हजार रूपयांची थैली लोकांनी दिली होती. ती त्यांनी शे.का.पक्षाला छापखाना काढण्यासाठी दिली. पुढे त्यांनी ‘ जनशक्ती ‘ साप्ताहिक सुरू केले. त्याचे संपादक शंकरराव मोरे हे होते. त्यानंतर कृष्णराव धुळप, वसंतराव राऊत हे संपादक असलेल्या ‘जय महाराष्ट्र’ या साप्ताहिकाचे संस्थापक भाऊसाहेब राऊत स्वत:च होते. पक्षवाढीसाठी केलेले त्यांचे हे कार्य उल्लेखनीय होय.
 
  • व्हिएन्ना येथील परिषदेत सहभाग 
सन १९५४ मध्ये व्हिएन्ना येथे जी जागतिक जंगल व शेतकरी कामगार परिषद भरली होती. त्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाऊसाहेब राऊत, र.के.खाडीलकर, ग.ल पाटील हे प्रतिनिधी म्हणून गेले होते. त्यांनी सोव्हिएत युनियन, इंग्लंड वगैरे देशाचा दौरा केला. कामगार चळवळीची माहिती करून घेतली.
 
सन १९६२ च्या विधानसभा निवडणूकीतील भूमिका
सन १९६२ मध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणूक होती. यावेळी राखीव जागेसाठी शेतकरी कामगार पक्षाचा कोणी स्थानिक उमेदवार तयार नव्हता . ही परिस्थिती पाहून भाऊसाहेब राऊत यांनी जुन्नरहून कृष्णा मुंढे यांना कर्जतमधून पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली. हे मुंढे येथील लोकांना पूर्णपणे अपरिचित होते. तरीसुद्धा केवळ भाऊसाहेब राऊत यांचा आदेश म्हणूनच कर्जतच्या जनतेने त्यांना निवडून दिले.  
 
  • सन १९६७ च्या लोकसभा निवडणूकीतील भूमिका
सन १९६७ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाऊसाहेब राऊत यांना कुलाबा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेला उभे राहण्यासाठी आग्रह करण्यात आला. तथापि भाऊसाहेब राऊत यांनी त्याला नम्रपणे नकार देऊन पक्ष ठरवील त्याच्यासाठी प्रचार करण्याचे मान्य केले. पक्षाने एक राजकीय डावपेच म्हणून काँग्रेसमधून बाहेर पडलेले पूर्वीचे ज्येष्ठ नेते नाना कुटे यांना उमेदवारी दिली . वस्तुतः त्यापूर्वी कट्टर काँग्रेस नेते म्हणुन कुटयाशी नाना पाटील व भाऊसाहेब राऊत यांचे हाडवैर होते. तरी नाना कुटयांना काँग्रेसच्या विरोधात निवडून आणण्यात जिल्हयातील काँग्रेस लोप पावले या उद्देशाने त्यांनी कुंटयांचा हिरीरीने प्रचार केला. यावरून असे दिसते की त्यांचा विरोध व्यक्तीला कधीही नव्हता. त्यांनी विरोध व संघर्ष केला तो तत्वासाठी ही त्यांची दूरदृष्टी म्हणावी लागेल. अशाप्रकारे भाऊसाहेब राऊत यांचे अतुलनिय कार्य होते.