भाई दाजिबा देसाई

जन्म व प्रारंभिक जीवन

भाई दाजीबा देसाई यांचा जन्म मंगळवार दि .१५ सप्टेंबर १ ९ २५ रोजी त्यांच्या आजोळी माडीगुंजी ( ता.खानापूर येथे झाला . त्यांच्या मात्या – पित्यांचे नाव अनुक्रमे यमुनाबाई आणि बळवंतराव असे होते . त्यांचे मूळ घराणे गोव्यातील. गोवा सोडल्यानंतर खानापूर तालुक्यातील किरावले या गावी ते स्थायिक झाले . त्यानंतर उंचगावला कायमचे स्थायिक झाले. त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण आजोळी घेतल्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण उचगांवला ( ता.जि.बेळगांव ) घेतले. बेळगांवच्या मराठा मंडळ हायस्कूलमध्ये मॅट्रिक परीक्षा चांगल्या रीतीने पास झाल्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण बेळगांव येथेच लिंगराज कॉलेजमध्येच झाले. विद्यार्थी दशेतच त्यांच्यात देशभक्ती जागी झाली. हा काळ १९४२ च्या चळवळीचा होता . आपणही देशकार्याला हातभार लावावा अशी इच्छा होऊ लागली . पकड वॉरंट निघाले . शेवटी पोलिसांना हुलकावणी देऊन लिंगराज कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी कोल्हापूर गाठले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून बी.ए.ची परीक्षा ऑनर्समध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर राजा लखमगौडा कॉलेज बेळगांव येथून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली .
त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत सहभाग घेतला . स्वतंत्रपणे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यानंतर सन १९४८ साली शेतकरी कामगार पक्षाची कोवाड ( ता.चंदगड ) येथे विराट सभा झाली. त्यात दाजीबा देसाई यांचे योगदान फार मोठे होते . भाई दाजीबा देसाई यांचा विवाह नामवंत कायदेपंडीत वकील , संस्थानिक काळातील मंत्री , सत्यशोधक समाजाचे पुढारी , शे.का.पक्षाचे नेते अॅड.व्ही.एस. पाटील यांची ज्येष्ठ कन्या लीला उर्फ अलका यांच्याशी १८ जून १९५२ साली लिंगराज कॉलेजच्या मैदानात घडून आला .

‘राष्ट्रवीर’चे संपादक म्हणून कार्य

भाई दाजीबा देसाई यांनी ‘राष्ट्रवीर’च्या संपादनाची धुरा सन १ ९ ६० पासून समर्थपणे सांभाळली . आर्थिक अडचणींना तोंड देत जागृती , दीनमित्र , विजयी मराठा या वृत्तपत्राप्रमाणेच ‘ राष्ट्रवीर ‘ साप्ताहिकासही मानाचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांच्या काळात सीमाप्रश्न , गोवा मुक्ती लढा , चीनचे आक्रमण , अशा महत्वाच्या राजकीय प्रश्नावर त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली . त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात , कुळ कायदा , पाटबंधारे योजना , शेती मालाच्या किंमती , सहकारी संस्था अशा प्रश्नांशी संबंधित विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा केली . तसेच समाजवादी व्यवस्थेबाबत त्यांनी मांडलेली मते शेतकरी कामगार पक्ष , साम्यवादी पक्ष यांच्या संदर्भात आपल्या संपादकीयात विपुल प्रमाणे लेखन केले आहे . भाई दाजीबा देसाई यांनी ‘ राष्ट्रवीर’ची सूत्रे हाती घेताच बहुजन समाजाची संस्थांनी ठेव अधिक भक्कम कशी होईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.
भाई दाजीबा देसाई यांच्याकडे संपादकपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीने या साप्ताहिकास बळकटी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला . शे.का.पक्षाची स्थापना १ ९ ४८ मध्ये झाली होती . या पक्षाने शेतकरी आणि कामगार यांना केंद्रबिंदू मानून राजकीय वाटचाल करण्याचे ठरविले होते . दाजीबा देसाई यांनी ‘ राष्ट्रवीर ‘ मध्ये शे.का.पक्षाने केलेल्या कार्याचा सातत्याने आढावा घेतल्याचे दिसते . विशेषत : देशात अधिक प्रमाणात शेतकरी आणि कामगार यांची संख्या मोठी असतानाही त्यांच्या प्रश्नाकडे अधिक प्रामाणिकपणे लक्ष दिले जात नाही . याबद्दल टिका केली होती . १९७७ साली लोकसभेची निवडणूक झाली . या निवडणूकीसाठी शे.का.पक्षाचे उमेदवार म्हणून दाजीबा देसाईंची निवड झाली . या निवडणूकीत दाजीबा देसाई निवडून आले .
भाई दाजीबा देसाई यांनी ‘ राष्ट्रवीर’चे संपादक म्हणून कार्य करीत असताना राजकीय कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले . त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळा’ची स्थापना झाली . त्याच्या कार्यास शामराव देसाई यांचा आशीर्वाद लाभला होता . या शिक्षण संस्थेसाठी त्यावेळचे भारताचे संरक्षण मंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या सहकार्याने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळासाठी संरक्षण खात्याकडून जागा मिळविली ; पण या जागेसाठी ४० हजार रू . भरणा करणे आवश्यक होते . त्या काळात ही रक्कम मोठी होती आणि पैसे जमा होणे कठीण होते . पैसे भरले नाहीतर जागा परत शासनाच्या ताब्यात जाण्याची शक्यता होती . यावेळी गुरूवर्य शामराव देसाई यांना भाई दाजीबा देसाई यांच्या समस्येची माहिती झाली . ही घटना १ ९ ६७ ची आहे . त्यानुसार बेळगांवातील प्रतिष्ठित मंडळींना शामराव देसाई यांनी आमंत्रित केले आणि त्यांना भाई दाजीबा देसाई यांच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली अशा परिस्थितीत भाई दाजीबा देसाई यांच्या विधायक कार्याला अल्पावधीतच गुरूवर्य देसाई यांनी २३ हजार रूपये उपलब्ध करून दिले . त्यामुळे कॉलेज उभारणीचा मार्ग सुकर झाला .