भाई उद्धवराव पाटील

भारतात असं बर्याचदा झालंय.. कर्तृत्ववानांना इतिहास डावलतो आणि चिंध्याचपाट्या करणार्यांच्या कैकांच्या जयंत्या पुण्यतिथ्या मोठ्या जोशात होतात. इतिहासाची कैक पानं बलिदानं आणि कर्तृत्वानं लाल झालीत पण कुणी ते सोईस्कर रित्या वाचतं कुणी डावलतं. असेच एक इतिहासानं डावललेले समाजपुरुष क्रांतिकारक नेते म्हणजे भाई उद्धवराव पाटील. “उद्धवदादांचा इतिहास क्रांतिनं नटलाय,राजकारणानं रंगलाय आणि समाजकार्यानं फुललाय..!”
 
उद्धवराव दादांची राजकारणी सुरुवात मोठी रंजक आहे. 1945 साली लातुरमधे महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन सुरु होते,सदरील अधिवेशनाचे अध्यक्ष होते काँग्रेसचे सावकार फुलचंद गांधी. निजामाने सावकारी नियंत्रण कायदा लागु केला होता. या कायद्याला विरोध सदरील गडगंज सावकार फुलचंद गांधीनी केला होता आणि आता तेच सावकार महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनुन बसले होते. दादांनी विद्यार्थ्यांचे संगठन करुन सदरील अधिवेशनातच “भक्षक हे रक्षक होऊ शकत नाहीत” या शिर्षकाचे पत्रक काढले व संपुर्ण अधिवेशनात वाटले. अधिवेशन हलवुन टाकणारे हे पत्रक होते. प्रकरण पेटलं कुणाच तरुणाला फुलचंद गांधींचं अध्यक्षपद मान्य होईना कारण गांधींकडं बर्याच शेकर्यांच्या जमिनी व कागदपत्रं गहाण होती. वाद पेटला,तरुण मंडळींसोबत उद्धवदादा आणि फुलचंद गांधी यांची समोरासमोर बैठक बसली.
बैठकीत उद्धवदादांनी फुलचंद गांधींना 2 अटी घातल्या.
 
1) फुलचंद गांधी सावकारी करणार नाहीत.
2) सावकारीत मिळालेल्या शेतकर्यांच्या जमिनी ते परत करतील.
 
फुलचंदांनी दोन्ही अटी जाहीरपणे स्विकारल्या. फुलचंद गांधींकडे असलेल्या सबंध जमिनी सुटल्या आणि त्यांची सावकारीही बंद पडली. हे सगळं केलं होतं एका 25 वर्षेवयाच्या तडफदार तरुणानं. यानंतर दादांनी हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्यात कैक अॅक्शन मधे सक्रिय कारवाया केल्या. 42 च्या पत्रिसरकारातले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे महत्वाचे सहकारी जी.डी.लाड यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेऊन दादांनी उस्मानाबाद जिल्ह्यात निजामासोबत सशस्त्र लढ्याला सुरुवात केली.
विस्तारभयास्तव एकच प्रसंग नमुद करतो.
परंडा तालुक्यात शेंद्री रेल्वेस्टेशनवर उद्धवदादा आणि त्यांच्या तरुण सहकारी सैनिकांनी भरदिवसा निजामाच्या पोलिस तुकडीवर हल्ला केला. अवघी 40-50 काडतुसं आणि 2 स्टेनगन्स या हत्यारानिशी दहा पंधरा जणांनी 500 जणांच्या सशस्त्र तुकडीवर हल्ला केला. पोलिस तुकडी पिंपरी भोईजी येथील पंडीतराव पाटील यांच्या वाड्यांत आश्रयासाठी घुसली. वाडा प्रशस्त असुन खाण्यापिण्याची तोशिस नव्हती तेव्हा ही उद्धवदादांची 10/15 जणांची तुकडी या पोलिस पार्टीला वाड्यातुन हकलवुन देण्याची तयारी भाई जी.डी.लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करु लागली. रोज रात्री या वाड्यावर ही तरणीबांड क्रांतिकारक सैनिक मंडळी हँड ग्रेनेड्स (हात बाँम्ब) टाकु लागली यामुळे पोलिसांचं झोपणं मुश्किल झालं. बर्याचदा पाठलागही केला गेला पण रोजच्या या होणार्या हल्ल्यामुळं सोलापुरच्या कलेक्टरनं ही तुकडी वाड्यातुन हलवली.
(मोठं पराक्रमी काम आहे हे 10/15 जणं 500 वर भारी पडतात.  असे अनेक प्रसंग आहेत. पुढे निजामाने निजाम राज्य हे मुसलमान राज्य बनविण्याचं मनावर घेतल्याने ठिकठिकाणी स्थानिक निर्दोष मुस्लिमांविरुद्ध जनतेचा रोष बसला. निजामावरचा राग काही समाजकंटक स्थानिक निर्दोषांवर काढु लागले यावेळी प्रसंगावधान राखत दादांनी विविध ठिकाणी समाज प्रबोधन केलं प्रसंगी मुसलमान वस्त्यांमधे सहकार्यांसोबत मुक्काम केले व त्यांना संरक्षणही पुरवले. याला सदसदविवेक बुद्धीच लागते दोस्तहो.. म्हणजे एकीकडे निजामाच्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध मरायला आणि मारायला तयार रहायचं दुसरीकडे निर्दोषांवर हल्ले होऊ नये म्हणुन प्रबोधनासोबत प्रसंगी स्वतः मुसलमानांच्या घरी मुक्कामी रहायचं.  याला नैतिकता,विवेकबुद्धी आणि हिमतीचं काळीज याचा संगम असावा लागतो जो उद्धवदादांच्यात अलबत होता.
 पुढे अन्नदात्या शेतकर्यांच्या हितासाठी सरकार दरबारी हक्काने जाब विचारण्याचा हेतु मनात ठेवुन उद्धवराव दादा हे “शेतकरी कामगार पक्ष” या पक्षातर्फे राजकारणात सक्रिय झाले. पोराला शेती जमत नाही असा विचार तिर्थरुपांच्या मनात आल्याने तो समज खोडुन काढण्यासाठी उद्धवदादा सहा महिन्यांसाठी पक्षकामातुन रजा घेऊन रहात्या गावी इर्ल्याला गेले व वडीलांना यशस्वी शेती करुन दाखवली यानंतर काहीही झालं तरी हा उपाशी मरणार नाही अशी खात्री उद्धवदादांच्या तिर्थरुपांना झाल्याने 100 ₹ पक्षासाठी हातात देऊन त्यांनी दादांना परत उस्मानाबादेत पाठवले. 1964 मधे उद्धवदादा राज्यसभेवर खासदार म्हणुन निवडुन गेले. यावेळी दादांच्या विरोधात प्रचारासाठी काँग्रसचे मातब्बर नेते यशवंतराव चव्हाण होते. यशवंतरावांचा 1956 पासुन काँग्रेसमधे मोठा दबदबा होता असं असतानाही काँग्रसच्या बर्याच आमदारांनी अंतर्गतरित्या दादांना समर्थन दिलं. ही गोष्ट फार मोठी होती,दिल्लीत कित्येक वेळा सोबत चहा घेत असताना यशवंतरावांनी दादांना त्या समर्थन देणार्या मतदान करणार्या आमदारांची नावं विचारली पण विश्वासार्हता कायम ठेवत दादांनी ती शेवटपर्यंत सांगितली नाहीत तसेच आपल्या आत्मचरित्रातही त्यांचा उल्लेख केला नाही यालाच शब्द पाळणं म्हणतात आणि विश्वासाला जागणं म्हणतात.
 
पुढे पक्षश्रेष्ठींच्या आग्रहास्तव उद्धवदादांनी उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातुन निवडणुक लढवली. दंगलींच्याकाळात मुस्लिमांना केलेल्या मदतीची परतफेड या समाजाने निवडणुकांत केली. दलित व मुस्लिम समाज खंबीरपणे दादांच्या मागे उभा होता. दादा सलग तीन वेळेस विधानसभेवर उस्मानाबाद मतदारसंघातुन निवडुन गेले.
पुर्णवेळ समाजकारण या सुत्रामुळे दादांनी स्वतःच्या वकीली व्यवसायावर पाणी सोडलं होतं. दादांच्या पत्नी या म्हशीचं दुध आणि किरकोळ गोष्टी विकुन घराची गुजराण करत होत्या याची जाणिव जनसामान्यांना असल्याने प्रचारासाठी लोक घरुन भाजी भाकर बांधुन आणत आणि पायी ये जा करत. दादांनी तीनही निवडणुका फक्त आणि फक्त लोकांच्या भरवशावर जिंकल्या होत्या कारण पदरचा पैसा खर्च करायला मुळात पैसाच नव्हता. अक्षरशः शाळकरी मुले उद्धवदादांचा प्रचार करत होती यावरुन जनमानसातला दादांचा प्रभाव आणि वावर स्पष्ट होतो.
जो लोकप्रतिनीधी साधेपणाने वागतो (साधेपणाचे अवडंबर न माजवता) तो लोकांना लोकांचा वाटतो. मग हा साधेपणा वागण्या बोलण्याचा असेल अथवा वावरण्याचा असेल अथवा सोबत असणार्या झुंडीचा अथवा समर्थकांचा असेल. लोक ज्या लोकप्रतिनिधीपर्यंत मनात कोणताही किंतु न ठेवता पोहोचू शकतात तो खरा. दादांची कारकिर्द पहाण्याचा योग आला नाही परंतु ज्यांनी ती पाहिली त्यांच्याकडुन ऐकताना प्रत्येकाच्या सांगण्यात एक समान दुवा होता तो म्हणजे “दादांचा साधेपणा,सहजपणा”.
 
दादांचं वक्तृत्व हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. हैद्राबाद असेंबली तसेच राज्यसभा आणि विधानसभेतील उद्धवदादांची भाषणं वाचण्याची तिव्र इच्छा आहे. कारण ती सद्य स्थितीवर परखड भाष्य करणारी तसेच विषयाचा सखोल गाभा असणारी असंत असं बर्याचदा ऐकलंय वाचलंय. कारण उद्धवदादांचं भाषण जर चालु असेल तर खुद्द यशवंतराव चव्हाणही उठलेले परत येऊन बसत असत. कैक सत्ताधारी सदस्य खास उद्धवदादांची अभ्यासपुर्ण भाषणे ऐकण्यासाठी त्यांची बोलण्याची वेळ येईतोपर्यंत थांबत असत. “राष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास आणि जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री.उद्धवराव पाटील.” असा उद्धवदादांचा उल्लेख यशवंतराव करतात.
तेव्हा असा अभ्यासु नेता आम्हाला लाभला याचा आम्हाला अभिमान असायला हवा तसंच उद्धवदादांवर साहित्यनिर्मितीही जोमात व्हायला हवी त्यांची सर्व मौलिक आणि अभ्यासपुर्ण भाषणे आमच्यासारख्यांना अभ्यासायला वाचायला मिळावी ही मनोमन इच्छा आहे.
 
“मार्क्सवाद, कम्युनिझम, साम्यवाद वाचायचा असेल तर सुरुवात मार्क्स-लेनिन पासुन करण्यापेक्षा उद्धवदादांच्या चरित्रापासुन व्हायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे.”
सुरुवातीपासुनचा कर्तृत्वाचा आलेख जर पाहिला तर सच्ची विचारसरणी,तारुण्याचा कैफ,तडफदारपणा या सर्व गोष्टी दादांच्या चरित्रातुन कळुन येतील.
समाजवादाचा जाहिर पुरस्कार, शेतकर्यांसाठी खुल्या बाजारपेठा,रोजगार हमी योजना,विद्यार्थ्यांना EBC सवलत ही उद्धवदादांची स्वप्नं व विरोधी पक्षनेता असताना मागण्या होत्या. समाजातील तळागाळातला व्यक्ती थेटपणे दादांशी बोलु भेटु शकत होता. यावरुनच एका खंद्या कम्युनिस्टाची एका विचारवंत समाजवादी व्यक्तीची ओळख पटते,याचमुळं वरती वाक्य वापरलंय की मार्क्सवाद,कम्युनिझम,साम्यवाद वाचायचा असेल तर सुरुवात मार्क्स-लेनिन पासुन करण्यापेक्षा उद्धवदादांच्या चरित्रापासुन व्हायला हवी. मार्क्स लेनिन हे बर्यापैकी दुरचे आणि अवजड वाटतात त्यामानाने उद्धवदादांचा कार्यकाळ जवळचाय,विचारसरणी आणि वागणंही परखड आहे,कर्तृत्वशैली सर्वसामान्यांच्या पत्थ्यावर पडणारी आहे त्यामुळं थेट मार्क्स लेनिन पर्यंत पोहोचण्या आधी थोडा विसावा ‘भाई उद्धवराव पाटील’ नावाच्या वळणावर घ्यावा असा आग्रह मी हक्कानी करेन.
आयुष्यभर साधेपणाचे व्रत अंगिकारणार्या, मायभुमीसाठी प्रसंगी शस्त्र उचलणार्या आणि शेतकरी विद्यार्थी तसंच जनसामान्यांसाठी पुर्णवेळ हितकारक समाजकारण करणार्या भाई उद्धवराव दादांना क्रांतिकारी लाल सलाम..!!!
भाई उद्धवराव पाटील जिंदाबाद..
 
संकलन: विशाल गवळी