
वाढीव विद्युत बिले माफ करा: अन्यथा आंदोलन – शेकापचा इशारा
वाढीव विद्युत बिले माफ करा: अन्यथा आंदोलन – शेकापचा इशारा
अलिबाग : लॉकडावूनमुळे आधीच आर्थिक संकटात असताना निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या रायगडकरांना महावितरणने शॉक देत वाढीव तसेच सरासरी बिल दिल्याने जनता त्रस्त आहे. त्यामुळे वाढीव बिलं रद्द करून ३०० युनिट पर्यंतची सर्व वीजबिले माफ करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत शेतकरी कामगार पक्षाने महावितरणला अल्टिमेटम दिला आहे.
शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापक्षाच्या शिष्टमंडळाने आज महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजित पिंगळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तालुका चिटणीस अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, अनिल पाटील, सुरेश घरत, सतीश म्हात्रे, कृतिका रानवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील महिन्यात शेकाप नेते माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हाभरात शेकापने प्रशासनाला निवेदन देऊन ३०० युनिट पर्यंतची वीज बिले माफ करण्याची मागणी केली होती. तीच मागणी पुढे नेत आज शेकापक्षाच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे असंख्य लोकांचे आर्थिक नुकसान झाले. कोरोनाच्या भीतीने घरात बसून काढावे लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असलेल्या सर्वाचीच दमछाक होऊन उपासमारीची वेळ आली. त्याच प्रमाणे आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नागरिकांचे कंबरडे मोडले. होते नव्हते तेवढे घरदार, झाडे, झुडपे सर्व मोडकळीस पडले अतोनात नुकसान झाले. या महामारी संकटातून सामान्य माणूस कसाबसा सावरत असतानाचं महावितरण कंपनीने बिलांचा मोठा शॉक ग्राहकांना दिला, भरपूर वाढीव बिले दिली. राज्य सरकारने घरगुती ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळातील दरमहा ३०० युनिट पर्यतची सर्व बिले माफ करावी. त्वरित मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करण्याची मागणी केली आहे.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार निसर्ग चक्रीवादळामुळे जे आर्थिक नुकसान झालेले आहे ते लक्षात घेता बिलाच्या रकमेत सूट मिळावी. जोपर्यंत ग्राहकांच्या शंकेचे निराकरण होत तोपर्यंत विजेचे कनेक्शन तोडण्यात येऊ नये अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली. त्यावर प्रभारी कार्यकारी अभियंता अजित पिंगळे यांनी ही मागणी मान्य करत वीज कनेक्शन तोडण्यात येणार नाही असे आश्वासन दिले आहे.
घरगुती बिला प्रमाणे कॉटेजेसचे आलेले भरमसाट बिल या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी लक्ष वेधले. त्याच प्रमाणे वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या प्रश्नाचा पाठपुरावा सुद्धा घेण्यात आला.