
कार्ल मार्क्स
(५ मे १८१८–१४ मार्च १८८३)
साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजशास्त्रज्ञ, अनेक समाजवादी विचारसरणींपैकी एका समाजवादी विचारसरणीचा प्रणेता. १९१८ साली झालेल्या रशियातील साम्यवादी क्रांतीच्या आणि १९४९ मध्ये चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा मूळ प्रणेता.
यहुदी वा ज्यू मातापितरांपासून पश्चिम जर्मनीतील ऱ्हाइनलंड या प्रांतातील ट्रीर शहरात कार्लचा जन्म झाला. पित्याचे नाव हाइन्रिख पित्याचा वकिलीचा धंदा चांगला चालत होता. त्याला खिश्चन धर्माचा स्वीकार करावा लागला त्याला ज्ञानोदय आंदोलनामध्ये रस होता, त्याचे कांट आणि व्हॉल्सेअर हे आवडते लेखक. कार्लला वयाच्या ६व्या वर्षीच बाप्तिस्मा मिळाला.
कार्लचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ट्रीर याच गावी झाले. ज्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण झाले त्याच्यावर सरकारची कडक नजर होती कारण तेथे उदार स्वातंत्र्यवादी विचाराच्या प्रभावाखाली काम करणारे शिक्षक होते. कार्ल मार्क्सच्या कुमारवयातील लेखनामध्येच मानवजातिकरता ख्रिस्ताप्रमाणे आत्मयज्ञ केला पाहिजे या उदात्त भावनेची अस्वस्थता व्यक्त होते: १८३५ मध्ये बॉनविद्यापीठामध्ये त्याला प्रवेश मिळाला. त्याने मानव्यविद्यांचा अभ्यासक्रम सुरू केला. ग्रीक व रोमन पुराणविद्या आणि कलेचा इतिहास हे विषय मार्क्सने निवडले होते. विद्यार्थ्याच्या बहिःशाल कार्यक्रमांमध्ये त्याने खूप रस घेतला. तो द्वंद्वयुद्धामध्येही लढला आहे. विद्यार्थ्याच्या राजकीय चळवळीमध्ये त्याने पुढारीपण केले. बंडखोर कविमंडळाचा सदस्य होऊन कविता लेखनही केले. विद्यार्थ्याच्या राजकारणाला भरती आली होती. १८३६ साली बॉन शहर सोडून बर्लिन विद्यापीठामध्ये विधिशास्त्र (कायदा) आणि तत्त्वज्ञान या विषयांकरता प्रवेश मिळवला.
बर्लिन येथे यंग हेगेलियन-तरुण हेगेलवादी-मंडळींच्या सहवासात मार्क्स आला. तत्त्वज्ञान आणि साहित्य या विषयांसंबंधी नवे विचारप्रवाह बर्लिनच्या बुद्धिमंत आणि साहित्यकारामध्ये खळखळून वहात होते. त्यांच्यामध्ये ब्रूनो बाउअर हा प्रमुख होता. हा धर्मशास्त्राचा व्याख्याता होता. मानवाच्या भावनात्मक आत्यंतिक गरजांमधून निर्माण झालेल्या अद्भुतरम्य दिवास्वप्नांची निर्मिती म्हणजे ख्रिस्ती बायबलमधील धर्मोपदेश होत आणि स्वतः ख्रिस्तही तसाच होय. ख्रिस्त ही ऐतिहासिक व्यक्ती नाही. फार मोठी सामाजिक उलथापालथ नजिकच्या भविष्यकाळी होणार आहे, असा भविष्यवाद बाउअर शिकवीत होता. बाउअर याला १८३९ मध्ये सरकारने विद्यापीठातून हाकलून दिले. तो कार्ल मार्क्सचा अत्यंत निकटचा मित्र होता.
येना विद्यापीठाला १८४१ मध्ये आपला डॉक्टरेटचा प्रबंध कार्ल मार्क्सने दिला. डीमॉक्रिटस आणि एपिक्यूरस या ग्रीक निसर्गतत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानाची हेगेलियन दृष्टिकोनातून मार्क्सने या प्रबंधात छाननी केली आहे. या प्रबंधामध्ये मार्क्सने म्हणले आहे : ‘तत्त्वज्ञान ही गोष्ट लपवीत नाही ती म्हणजे प्रॉमीथिअस या देवपुत्राची कबुली. तत्त्वज्ञानालाही सगळ्या देवांची घृणा आहे. प्रॉमीथिअस महान संत व हुतात्मा होता, ही गोष्ट तत्त्वज्ञानाच्या इतिहासाने नोंदवली आहे.’
विद्यापीठीय पदवी मिळण्यापूर्वीच तो डाव्या तरुण हेगेलवाद्यांच्या गटाचा सदस्य बनला आणि कडवा अनीश्वरवादी नास्तिक म्हणून प्रसिद्धीस आला. तेव्हाच त्याने जीवनातील एक सिद्धान्त निश्चित केला तो म्हणजे ‘धर्माची समीक्षा सर्वसमीक्षेचा प्रारंभ होय.’या त्याच्या नास्तिक्याच्या प्रसिद्धीमुळे प्रशियन सरकारने त्याला विद्यापीठातून काढून टाकले. मार्क्सचा अनीश्वरवाद अधिक खोलावला तो लुडबिग फायरबाख याच्या एसन्स ऑफ ख्रिश्च्यनिटी या ग्रंथामुळे. या ग्रंथामुळेच कार्ल मार्क्स हेगेलपासून दूर गेला आणि त्याचे भौतिकवादी तत्त्वज्ञान अधिक पक्के झाले. हेगेलचा विरोध-विकासवाद आणि फायरबाखचा भौतिकवाद यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न मार्क्स सतत करीत राहिला.
१८४२ जानेवारीमध्ये जर्मनीतील कोलोन या शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या ऱ्हाइनिश्चे झाइटुंग या वृत्तपत्रात मार्क्सने लेखन सुरू केले. मार्क्सने लेखनस्वातंत्र्यावर जे लेखन केले आहे, ते ह्याच काळातील होय. कोलोन हे शहर त्या काळी जर्मनीतील पुढारलेले औद्योगिक शहर होते. त्या शहरातील तरुण व्यापारी, बँक चालविणारे आणि उद्योजक यांच्या गटाचे उदार लोकशाहीवादी मुखपत्र म्हणून वरील वृत्तपत्र चालविले जात होते. मार्क्सने लेखनस्वातंत्र्याबद्दल असा मुद्दा मांडला आहे की, ‘दुबळे आणि दुर्बुद्धीचे मर्त्य मानव जेव्हा दुसऱ्याच्या लेखनस्वातंत्र्यावर आघात करतात, मर्यादा घालतात, तेव्हा ते स्वताःला सर्वज्ञ समजत असतात’. या कालखंडात मार्क्सची उच्चतम नैतिक मानदंडावर आणि विश्वव्यापी नीतिशास्त्रावर श्रद्धा होती. १५ ऑक्टोबर १८४२ रोजी ऱ्हाइनिदचे झाइटुंग या वृत्तपत्राचा तो संपादक बनला. त्यात साम्यवादाची एका नव्या रूपात मांडणी त्याने सुरू केली. व्यावहारिक बुद्धीचे, उदारमतवादी, कायद्याच्या मर्यादेत राहून स्वातंत्र्याचा विस्तार करावा अशा मताचे लोक त्याने आपल्या मित्रमंडळीत सामावून घेतले होते. जर्मनीच्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये मार्क्सच्या वृत्तपत्राने प्रमुख स्थान मिळविले. त्याचा तिप्पट खप होऊ लागला. रशियन सरकारच्या दबावामुळे जर्मन सत्ताधाऱ्यांनी मार्क्सचे हे वृत्तपत्र बंद पाडले.
जेनी व्हान वेस्टफॉलेन या आकर्षक, हुशार, वाखाणलेल्या उच्चकुलीन तरूणीशी त्याची ७ वर्षे मैत्री होती. जून १८४३ मध्ये तिच्याशी मार्क्स विवाहबद्ध झाला. जेनीच्या वडिलांना कार्ल मार्क्स हा तरूण आवडत होता परंतु त्या कुटुंबातील इतर मंडळींना हा विवाह मान्य नव्हता. तिच्या वडिलांना असेही वाटे, की आपण आपल्या मुलीचा मोठ्या असुराला बळी दिला आहे.
फ्रेंच साम्यवादाचा आभ्यास करण्याकरता मार्क्स पॅरिसला गेला. फ्रेंच आणि जर्मन कामगारवर्गाच्या साम्यवादी संघटनांशी त्याचा संबंध आला. त्यात या संघटनांची विचारसरणी ओबडधोबड आहे, तिला नीट तर्कशुद्ध आकार नाही, हे मार्क्सच्या लक्षात आले परंतु या कामगार संघटनांच्या जीवनाचा मानवी बंधुत्व हा स्थायीभाव झाला आहे तो केवळ भाषेचा अलंकार राहिला नाही हेही त्याला दिसले. याच काळामध्ये पहिला सुप्रसिद्ध ग्रंथ इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट्स ऑफ १८४४ मार्क्सने लिहून काढला. याच वर्षी टोअर्ड द क्रिटिक ऑफ द हेगेलियन फिलॉसॉफि ऑफ राइट हा निबंध प्रसिद्ध झाला. धर्म ही जनतेची अफू आहे, हा मार्क्सचा निष्कर्ष या निबंधात आला असून त्याचप्रमाणे कामगारांना उठावाचे आवाहनही त्यातच पहिल्यांदा आले आहे. जर्मन सरकारचे मार्क्सचे बारीक लक्ष होतेच. फ्रांसच्या सरकारने जर्मन सरकारचा रोख लक्षात घेऊन मार्क्सला हद्दपार केले. ५ फेब्रुवारी १८४५ रोजी मार्क्स ब्रूसेल्सला येऊन राहिला. त्याने जर्मन नागरिकताही टाकली.
ब्रूसेल्सला आल्यानंतर तेथील २ वर्षांच्या काळात फ्रीड्रिख एंगेल्स याच्याशी समान ध्येयवादामुळे मैत्री दृढ झाली ती जन्मभर टिकली. एंगेल्सचा इंग्लंमध्ये मँचेस्टर येथे कापड कारखाना होता. त्यात त्याला १८६४ पासून चांगली मिळकत होत होती. त्या वेळच्या इंग्लंमधील औद्योगिक क्रांतीचेही अनुकूल-प्रतिकूल परिणाम त्याला अभ्यासावयास मिळाले. मोझेस हेस, रॉबर्ट ओएन व तरूण हेगेलवादी यांच्या प्रभावाखाली येऊन एंगेल्स अगोदरच साम्यवादी झाला होता. मार्क्सच्या मैत्रीच्या काळात तो साम्यवादाचा तत्त्वज्ञानी बनला. वैचारिक सहकार्य सुरू झाले. त्या दोघाना मिळून प्रथम द होली फॅमिली आणि द जर्मन आयडियॉलॉजी हे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहून पूर्ण केले. इतिहासाची भौतिक उपपत्ती सविस्तर रीतीने या ग्रंथांमध्ये मांडली आहे. हे दोन ग्रंथ त्यांच्या हयातीत कधीच प्रकाशित होऊ शकले नाहीत कारण प्रकाशक मिळाला नाही. ब्रूसेल्समध्ये असतानाच कामगार चळवळीच्या मुख्य नेत्यांच्या विचारांशी मार्क्सला सामना करावा लागला. त्यातील काही नेते नीतित्त्वाच्या आधाराने कामगारांच्या गाऱ्हाण्यांना महत्त्व देऊ लागले. तेव्हा मार्क्सने सागितले की अशा केवळ समतावादी नैतिक ध्येयाने क्रांती होऊ शकत नाही. क्रांतीकरता अनुकूल अशी ऐतिहासिक परिस्थिती निर्माण व्हावी लागते. सामाजिक परिवर्तने विशिष्ट कार्यकारणभावाची प्रक्रिया असते. ती नियमबद्ध असते. भांडवलदारी समाजाच्या अवस्थेमध्ये येत असताना ही अवस्था एकदम ओलांडून पलीकडे समाजाला जाता येणार नाही लगेच साम्यवादाकडे जाता येणार नाही. फ्रेंच समाजवादी तत्त्वज्ञ प्रूदाँ याचा द फिलॉसॉफी ऑफ पॉव्हर्टी हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्याबरोबर कार्ल मार्क्सने त्याच्याविरूद्ध खंडन करणारा द पॉव्हर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला. भिन्नभिन्न अर्थव्यवस्थांच्या मधील चांगले गुण घ्यावे आणि दोष टाकावे आणि समन्वय साधावा, असे प्रूदाँचे मत होते. मार्क्सच्या मताने अशी तडजोडीची अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. ऐतिहासिक शक्तींचे अपरिहार्य नियम असतात. त्या नियमानुसारे समाजसंस्थेला आकार येतो. विशिष्ट आकार देणारी उच्च-नीच वर्गरचना अपरिहार्यपणेच निर्माण होते.
यानंतर द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही पुस्तिका एका विलक्षण परिस्थितीमध्ये मार्क्स आणि एंगेल्स यांनी लिहिली आणि ती प्रसिद्ध झाली. यूरोपातील ‘द लीग ऑफ द-जस्ट’ नामक गुप्तमंडळी जून १८४७ मध्ये लंडन येथे जमली आणि त्यांच्या बैठकीत राजकीय कार्यक्रम तयार करण्याचे ठरविण्यात आले. या मंडळींनी मार्क्सकडे एक प्रतिनिधी पाठवून त्याला विनंती केली, की तू आमच्या या लीगचा सभासद हो. मार्क्स एंगेल्ससह त्या लीगमध्ये सामील झाला. त्या लीगचे नाव बदलून ‘कम्युनिस्ट लीग’ असे ठेवले. मार्क्स आणि एंगेल्संना कार्यक्रम आखण्यास सागितले. १८४७ च्या डिसेंबरपासून१८४८ च्या जानेवारी अखेरपर्यंत खपून कम्युनिस्ट जाहीरनामा त्यांनी तयार केला आणि तो लीगने स्वीकारला. त्यात प्रथम इतिहासाचा मुख्य सिद्धांत सांगितला. वर्गविग्रहाचा इतिहास हाच इतिहास होय हा सिद्धांत प्रथम सांगून वर्गविहीन समाजरचना निर्माण होण्याकरता शेवटचा विग्रह कामगारवर्गाचा विग्रह होणार आणि त्या विग्रहाचा विजय होऊन शेवटी समताप्रधान साम्यवादी समाजरचना निर्माण होईल, असे भविष्य वर्तविले आहे. हा जाहीरनामा साम्यवादाच्या इतिहासामधील विचारांच्या प्रचाराचे एकमेव, अद्वितीय असे साधन ठरले.
फ्रांस, इटली आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये १८४८ च्या पूर्वार्धात क्रांतीची लाट उसळली. बेल्जियमचे सरकार मार्क्सला हद्दपार करणार हे लक्षात घेऊन या क्रांतिकारक गटाच्या एका सदस्याने मार्क्सला पॅरिस येथे बोलावून घेतले. एक जर्मन क्रातिकारकांचा गट पॅरिसमध्ये होता. जर्मनीवर आक्रमण करून जर्मनीला राजसत्तेच्या विळख्यातून सोडवण्याकरता जर्मनीवर आक्रमण करावे, असा बेत तो गट आखीत होता. हा आक्रमणाचा कार्यक्रम मार्क्सने अव्यवहार्य म्हणून असंमत केला. त्यामुळे मार्क्सबद्दल क्रांतिकारक नाखूष झाले. ऑस्ट्रिया व जर्मनीत क्रांती पसरतच होती. त्यामुळे मार्क्सला जर्मनीत परतावे असे वाटले. तेथे परतल्यावर कोलोन येथे कामगारक्रांतीचा कार्यक्रम अंमलात आणावा की लोकशाहीवादी शक्तीमध्ये तडजोड करून कामगारवर्ग आणि उदारमतवादी लोकशाही मध्यम वर्ग यांचे संयुक्त सरकार स्थापन करावे, असा प्रश्न पडला असताना मार्क्सने तडजेडवादी धोरण पुरस्कारिले. न्यू ऱ्हाइनिश्चे झाइटुंग या नवीनच, १८४९ जूनमध्ये स्थापन झालेल्या वृत्तपत्रात आपला दृष्टिकोन मार्क्सने मांडण्यास सुरूवात केली. जर्मनीच्या सम्राटाने बर्लिनची लोकसभा बरखास्त केली. त्याविरूद्ध मार्क्सने सशस्त्र उठाव करण्याला आव्हाहन दिले. कोलोन या शहरात कामगारांच्या जमावापुढे भाषण केले. मार्क्सवर सरकारने राजद्रेहाचा खटला भरला. त्यात मार्क्सने आपली बाजू संविधानाशी सुसंगत आहे असे सिद्ध केले. जर्मनीचा राजाच घटनेविरुद्ध वागला हे दाखवून दिले. न्यायाधिश मंडळाने मार्क्सची बाजू मान्य करून त्याला दोषमुक्त केले परंतु मार्क्सला घटनेच्या अनुसाराने संसदेची पुन्हा स्थापना करण्यात यश आले नाही. लोकांच्या उठावांचा उपयोग झाला नाही. १६ मे १९४९ मध्ये मार्क्सला हद्दपारीची शिक्षा झाली त्याने चालविलेल्या वृत्तपत्राचा शेवटचा प्रक्षोभक अंक प्रसिद्ध झाला.
मार्क्स पॅरिसला गेला परंतु तेथूनही त्याला हद्दपार व्हावा लागले. १८४९ ऑगस्टमध्ये तो लंडनला कायम राहण्यास गेला. उदारमतवादी मध्यम वर्गाशी जुळते घेऊन लोकशाही पूरोगामी राजकारणावरील त्याचा विश्वास उडाला. लंडन येथील कम्युनिस्ट लीगमध्ये तो सामील झाला आणि डाव्या जहाल क्रांतीकारी राजकारणाचा पुरस्कार पुन्हा करू लागला. त्याला वाटले, की पुन्हा आर्थिक दुरवस्थेचा संकटकाळ जवळ येत आहे. क्रांतीची चळवळ पुन्हा वर उफाळून येणे शक्य आहे. परंतु ही आशा फार वेळ टिकली नाही. ज्यांचा आशावाद टिकला व प्रखर होत गेला अशा ऑगस्ट व्हॉन विलिचसारख्या क्रांतिकारकांना ‘लोखंडाचे सोने बनवणारे जादूगार क्रांतिकारक’ म्हणून तो हिणवू लागला. असे अधिर मनोवृत्तीचे क्रांतिकारक हे भौतिकवादी नसतात, असे त्याने सांगितले. ‘प्रत्यक्ष वास्तव घटनांच्या आधारेच क्रांती होते केवळ क्रांतीची शुद्ध वासना क्रांतीला प्रसवू शकत नाही. आम्ही कामगारांना सांगतो की १५, २०, ५० वर्षे चालणारी अनेक यादवी युद्धे आणि राष्ट्रीय युद्धे परिस्थिती बदलून टाकतात एवढेच नव्हे, तर तुम्हालाही बदलून टाकतात. तुम्हाला राजकीय सत्ता वापरण्यास समर्थ करतात. याच्या उलट तुम्ही सांगता की आपण राजकीय सत्ता त्वरित मिळविली पाहिजे.’
१८४८ हे वर्ष यूरोपमधील राजकीय बंडे व त्यांच्या पराभवांचे वर्ष होय. या वर्षातील परिस्थितीचे पृथक्करण कार्ल मार्क्सने गंभीरपणे केले. निष्कर्ष काढला, की कामगारवर्गाचे वैचारिक शिक्षण पक्के व्हावयास पाहिजे. कामगार पक्षाने इतर पक्षांशी तडजोड करावी, ध्येयवादाला मर्यादा घालणे भाग पडले, मार्क्सचा १८५० ते १८६४ हा काळ मानसिक यातना आणि कौटुंबिक, आर्थिक विवंचना यांमध्ये गेला. मार्च १८५० मध्ये तो, त्याची बायको, त्याची ४ लहान मुले यांना बिऱ्हाड सोडावे लागले आणि कर्जापायी होते-नव्हते तेवढे गमवावे लागले. मुलगा आणि मुली उपासमारीने व दीर्घ आजाराने वारली. फ्रान्झिस्का ह्या मुलीला पुरण्याकरता लागणारी पेटी विकत घेण्याकरता बायकोला कर्ज काढावे लागले. सोहो येथे ६ वर्ष उपासमारितच या कुटुंबाची गेली. केवळ ब्रेड आणि बटाटे यांच्यावर गुजराण करावी लागली. सावकार कर्जवसुलीला आला म्हणजे मुले म्हणायची, की बाबा घरात नाहीत. सावकारांना चुकवण्याकरता एकदा मँचेस्टर येथे पळून जावे लागले. कार्ल मार्क्सची बायको मनाने खूप थकली. फ्रीड्रिख एंगेल्सची आर्थिक मदत पहिल्यांदा फारच थोडी येत होती. एंगेल्स मँचेस्टर येथे कारखान्यामध्ये कालांतराने भागीदार झाला तेव्हा म्हणजे १८६४ मध्ये मार्क्सला तो पुरेशी आर्थिक मदत देऊ लागला. इतरही अनेक मित्रांनी आणि बायकोच्या नातेवाईकांनीही थोडीबहुत मदत केलीच परंतु चणचण कायम राहिली. ब्रेड आणि बटाटे पुरेसे मिळतील याची तरतूद कायम झाली एक अल्पसे उत्पन्न १८५१ पासून सुरू झाले. द न्यूयॉर्क ट्रिब्यून या वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक चार्ल्स ए. डाना याने यूरोपचा वार्ताहर म्हणून मार्क्सची नेमणूक केली. होरेस ग्रीली हा या वृत्तपत्राचा संपादक होता. फोरियरप्रणीत साम्यवादी विचारसरणीबद्दल त्याला सहानुभूती होती. १८५१ ते १८६२ पर्यतच्या कालावधीत सु. ५०० लेख आणि संपादकीय मजकूर मार्क्सने पाठविला. त्यात एंगेल्सचाही चवथा हिस्सा होता. या लेखांचे विषय त्या काळचे सगळे राजकीय विश्व, त्यातील सामाजिक चळवळी आणि आंदोलने होती भारत, चीन ते ब्रिटन आणि स्पेन यांचा अंतर्भाव केला होता. लंडन येथे दारिद्र्य आणि कौटुंबिक आपत्तीशी तोंड देत असतानाच कार्ल मार्क्सने आपला बौद्धिक व्यासंग अधिक निष्ठेने आणि एकाग्र चित्ताने चालविला. ब्रिटिश म्यूझियमचा त्याने चांगला उपयोग करून घेतला. मानवाचा आर्थिक आणि सामाजिक इतिहास या विषयावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. इतिहासाची भौतिक उपपत्ती हा सिद्धांत त्याने ऐतिहासिक घटनांच्या आधारावर परिष्कृत केला. त्याची सारभूत मांडणी १८५९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ए कॉट्रिब्यूशन ट्र द किटिक ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी या अर्थशास्त्रावरिल त्याच्या पहिल्या पुस्तकात त्याने केली. इतिहासाची भौतिक उपपत्ती निश्चित कशी केली याबद्दल तो या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतो –“जीवनाच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक प्रक्रियांचे सामान्य स्वरूप हे भौतिक जीवनामधल्या उत्पादनपद्धतीने निश्चित होते. माणसाची जाणीव माणसाच्या अस्तित्वाला आकार देत नाही परंतु उलट त्याचे सामाजिक अस्तित्व त्याच्या जाणिवेला आकार देते.”
हे मूलभूत सूत्र त्याच्या दुसऱ्या मूलभूत सूत्राचा आधार ठरते. तात्त्विक उपपत्ती आणि प्रत्यक्ष वर्तन याची नित्य सांगड असली पाहीजे हे ते दुसरे मूलभूत सूत्र होय. पहिल्या मूलभूत सूत्राबद्दल माक्स वेबरसारख्या समाजशास्त्रज्ञांनी मतभेद व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे असे, की वैचारिक प्रेरणादेखील वास्तविक जीवनाला कलाटणी देऊन विकासाच्या वरच्या पायरीवर पोचवू शकते इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीचे उदाहरण या संदर्भात विचारात घेतले असताना नीट उलगडा होतो. प्रॉटेस्टंट नीतिशास्त्राच्या प्रेरणेने इंग्लंडमध्ये उद्योजक हे औद्योगिक क्रांतीची रचना करण्यात यशस्वी झाले, असे माक्स वेबरने दाखवून दिले आहे.
१८६४ च्या अखेरीस मार्क्सने ‘इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन’ या संस्थेत शिरून एकलकोंडेपण संपविले. या संस्थेचा तो वैचारिक नेता बनला. २८ सप्टेंबर १८६४ ला या संस्थेची सार्वजनिक ठिकाणी सभा झाली त्यात जर्मन कामगारांचा प्रतिनिधी म्हणून कार्ल मार्क्स उपस्थित राहिला. या संस्थेच्या एका उपसमितीवर त्याची नेमणूक झाली. या संस्थेला त्याच्या वृत्तपत्रीय दीर्घकालीन अनुभवाचा फार उपयोग झाला. त्याने या संस्थेपुढे एक लेखी व्याख्यान दिले. त्या व्याख्यानात सहकारी चळवळीच्या विधायक कार्याचे महत्त्व आणि संसदीय कायद्याचे महत्त्व दाखवून संथ गतीने ब्रिटीश कामगारांना राजकीय सत्ता जिंकता येईल, हे पटविण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या सर्वसाधारण सभेचा सदस्य म्हणून मार्क्स याने जवळजवळ सगळ्या बैठकींना उपस्थित राहण्याचा नियम पाळला. निरनिराळे पक्षोपपक्ष, गट आणि उपगट यांच्यातील आपसातल्या मतभेदांना सामावून घेण्याची आणि सार्वत्रिक ऐकमत्य जास्तीतजास्त निर्माण करण्याची व्यावहारकुशलता मार्क्सच्या ठिकाणी या कालखंडात आढळून आली. या संघटनेची सदस्यसंख्या १८६९ मध्ये आठ लाखांच्या पुढे गेली.
१८७० मध्ये फ्रेंच-जर्मन युद्धात फ्रान्सचा पराभव झाला. त्यानंतर १८७१ च्या मार्चमध्ये पॅरिस येथे पॅरिस कम्यून नावाची क्रांतीकारी संघटना निर्माण होऊन तिच्या हाती पॅरिसची राजकीय सत्ता आली. या पॅरिस कम्यूनला मार्क्सने संपूर्णपणे पाठिंबा दिला. मार्क्सचे राजकीय व्यक्तिमत्त्व आतापर्यंत स्थानिक लोकांनाच माहित होते. ते सगळ्या युरोपच्या दृष्टीसमोर आले त्याला आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त झाले. त्या पॅरिस कम्यूनबद्दल त्याने काढलेले प्रसिद्ध उद्गार असे, ‘ या श्रेयाशी तुलना होऊ शकेल असे एकही उदाहरण इतिहासात सापडायचे नाही. या क्रांतीमध्ये जे हुतात्मे स्वतःची आहुती देऊन गेले, त्यांना कामगार वर्गाच्या श्रेष्ठ हृदयमंदिरात शाश्वत स्थान प्राप्त झाले आहे.’ एंगेल्सच्या मताप्रमाणे ‘पॅरिस कम्यून’ हे इतिहासातील कामगार हुकूमशाहीचे पहिले उदाहरण होय. वरील लेखामुळे फर्स्ट इंटरनॅशनलचा नेता म्हणून मार्क्सचे नाव सर्व युरोपभर गाजले. ३० मे १८७१ मध्ये हे पॅरिस कम्यून दडपून टाकण्यात आले.
पॅरिस कम्यूनच्या पराभवानंतर ‘इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन’, या संघटनेमध्ये फाटाफुट होण्यास सुरुवात झाली. कार्ल मार्क्सने पॅरिस कम्यूनला उचलून धरले हे जॉर्ज ओजरसारख्या इंग्लिश मजूर-नेत्याला मान्य नव्हते. इंग्लिश संसदेने १८६७ साली कामगारवर्गाला मतदानाचा हक्क सम्मत केला. त्यामुळे कामगार संघटनांना राजकीय कृती करण्यास आवश्यक असे व्यापक स्वतंत्र्य लाभले. उदारमतवादी पक्षाला त्या वेळी इंग्लंडमध्ये महत्त्व होते. त्याच्याशी सहकार्य करून कामगारवर्गाचे प्रश्न चागल्या रीतीने निर्णित होतील, असा कामगार नेत्यांना विश्वास उत्पन्न झाला. त्यामुळे मार्क्सची भुमिका अतिरेकी म्हणून अमान्य झाली.
अराज्यवादी तत्त्वज्ञानाचा किंवा ध्येयवादाचा प्रणेता म्यिकईल अल्यिक्सांद्रव्ह्यिच बकून्यीन यांच्या प्रभावाखाली इंग्लंडच्या जनरल कौन्सिलमध्ये डावा गट वाढीस लागला. झारच्या कारागृहातून व सायबीरियाच्या हद्दपारीतून निसटलेला हा रशियन क्रांतीकारक मार्क्सच्या विरोधात उभा राहिला. दोघेही ‘पॅरिस कम्यून’चे पुरस्कर्ते होते. परंतु बकून्यीनला इटली, स्वित्झर्लंड, फ्रान्स इ. देशांतील तरूण अनुयायी मोठ्या प्रमाणात मिळाले. त्याने ‘इंटरनॅशनल अलायन्स ऑफ सोशल डेमॉक्रसी’ नावाची गुप्तमंडळी स्थापन केली. या गुप्तमंडळीला फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये प्रवेश मिळू नये, म्हणून मार्क्सने अगोदरच बंदोबस्त करून ठेवला होता. मार्क्स हा जर्मन हुकूमशाहा आहे. असा बकून्यीनने त्याच्यावर आरोप ठेवला आणि मार्क्सविरुद्ध फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये फळी उभी करण्याचा प्रयत्न केला. १८७२ च्या हेग येथे भरलेल्या इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये मार्क्सने बकून्यीनवाद्यांचा पराभव घडवून आणला. जनरल कौन्सिलमध्ये बकून्यीनवाद्यांचा प्रभाव होताच. एंगेल्सने युक्त्या प्रयुक्त्या लढवून जनरल कौन्सिल हे लंडनहून न्यूयॉर्क येथे हलविले. बकून्यीनवाद्यांना फर्स्ट इंटरनॅशनलच्या जनरल कौन्सिलमधून हाकलून लावले. परंतू कौन्सिल न्यूयॉर्कमध्ये तग धरू शकले नाही ते नष्ट झाले.
अखेरच्या १० वर्षाच्या कालखंडात मार्क्सच्या सर्जनशक्तीला उतरती कळा लागली. ‘खिळलेला मानसिक निरुत्साह’ असे या अवस्थेला मार्क्सनेच स्वतः निर्दिष्ट केले आहे. रशियन साम्राज्यशाही ही सर्वांत मोठी प्रतीगामी शक्ती यूरोपात आहे आणि तिचा नाश झाल्यानंतरच कामगारवर्गाच्या उत्साहशक्तीला प्रेरणा मिळून राजकीय सामर्थ्य प्राप्त होईल आणि ही गोष्ट यूरोपमध्ये युद्धाचा भडका उडूनच घडणे शक्य आहे, असे त्याला वाटत होते. १८८१ मध्ये अलेक्झांडर दुसरा हा रशियाचा झार रशियन अतिरेक्यांनी ठार केला या अतिरेक्यांच्या निःस्वार्थी हुतात्मेपणाची भावपूर्ण प्रशंसा कार्ल मार्क्सने केली. शेवटची काही वर्षे मार्क्सने आरोग्यधामामध्येच काढली. २ डिसेंबर १८८१ मध्ये त्याची अत्यंत प्रिय पत्नी कालवश झाली. त्यामुळे तो खचला. त्याची सगळ्यात वडील मुलगी जैनी लाँगे ११ जानेवारी १८८३ मध्ये निवर्तली आणि नंतर २ महिन्यांतच कार्ल मार्क्सची जीवितयात्रा संपली. इंग्लंडमधील हायगेट सिमेटरमध्ये त्याचे दफन झाले. त्यावेळी एंगेल्सने श्रध्दांजली अर्पण करताना म्हटले, की मार्क्सने दोन मोठे शोध सिद्ध केले: (१) मानवी इतिहासाच्या विकासाचा नियम आणि (२) भांडवलशाही समाजरचनेचे गतित्त्व. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्स हा मुख्यतः क्रांतीवादी होता. त्याच्या हयातीतच तो अत्यंत व्देषास आणि निंदेस पात्र झाला परंतु कोट्यावधी क्रांतीकारकांना तो अत्यंत आवडत होता, पूजनीय वाटत होता आणि ते त्याच्या मृत्यूने पराकाष्ठेचे व्यथीत आणि दुःखित झाले.
दास कॅपिटल (भाग १) हा त्याचा उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रंथ होय. इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन या संघटनेन कामगारांचा पवित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे वर्णन केलेले आहे. बर्लिन येथे १८६७ मध्ये हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला आणि १८७३ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती निघाली. मार्क्सने भाग दोन आणि तीन हेही लिहीले परंतू त्यांचे संपादन करून एंगेल्सने मार्क्सच्या देहान्तानंतर १८८५ आणि १८९४ मध्ये क्रमाने प्रसिद्ध केले. मार्क्सने इंग्लिश भांडवलशाहीचे अवलोकन केले, इंग्लिश अर्थशास्राच्या परिभाषेतच आपले अर्थशास्रीय विचार व्याक्त केले. भांडवलशाही समाजव्यावस्था ही प्रत्येक समाजरचनेसारखीच, जिवंत शरीरासारखी रचना आहे. तिचा विकास तिच्या अंतर्गत स्वभावनियमानेच होतो. नफा मिळविण्याची प्रवृत्ती अपयशी होऊ लागली, नफा कमी होऊ लागला म्हणजे संबंध समाजरचना डळमळते भांडवलशाहीचा नाश होतो आणि तिच्या ठिकाणी अधिक उच्च दर्जाच्या समाजसंस्थेची स्थापना होते. ब्रिटिश कामगारवर्गाचे दैन्य व दुर्दशा मार्क्सने पाहिली आणि मोजली आणि त्यावरून भविष्यवाद काढला, की या भांडवलशाहीच्या खाजगी संपत्तीवर खिळा ठोकळा जात आहे आणि ज्यांनी लुटले ते लुटले जाणार आहेत. पीडीत जनतेला फार मोठा आशावादी दृष्टिकोन देण्यात मार्क्स हा यशस्वी झाला.
साभार: मराठी विश्वकोश