
‘कोरोना’ उपचारांसाठी कामगारांना आर्थिक लाभ द्या
शेतकरी कामगार पक्षाची मागणी
मुंबई ( २४ मे ) : राज्यातील नोंदणीकृत बांधकाम व इतर कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना असाध्य आजारकाळात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पंचेवीस हजार रूपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेत ‘ कोरोना’ चा या दुर्धर आजारांमध्ये समावेश करुन लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.
शेतकरी कामगार पक्षातर्फे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या योजनेच्या यादीत ‘कोरोना’ या रोगाचा समावेश अद्याप करणेत आलेला नाही. त्यामुळे कामगारांना ‘कोरोना’सारख्या दुर्धर आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
‘कोरोना’या आजाराचा समावेश महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या असाध्य आजार यादीत केल्यास, गरीब गरजू कामगारांना किमान २५ हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार असल्याने या आजाराचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या असाध्य आजार यादीत समावेश करावा, अशी मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.