शासनाने खरेदी केलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी : शेतकरी कामगार पक्षाची छगन भुजबळ यांचेकडे मागणी

 

शासनाने खरेदी केलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी : शेतकरी कामगार पक्षाची छगन भुजबळ यांचेकडे मागणी

गडचिरोली (२९ सप्टेंबर) : केंद्र सरकारच्या NeML चे पोर्टल वर लाॅट एन्ट्री न झाल्याचे कारण देवून शासनाने खरेदी केलेला मका व ज्वारी शेतकऱ्यांना परत न करता सदर भरडधान्याच्या बिलाची रक्कम तातडीने अदा करुन संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचेकडे केली आहे.

राज्यभरातील स्थानिक खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या पत्रानुसार हजारो शेतकऱ्यांना, आपण विकलेल्या मक्याची ऑनलाईन एन्ट्री झालेली नाही कारण शासनाने खरेदीचे लॉट एन्ट्री करणारे ऍप्स मुदतपूर्व बंद केल्याने व केंद्र शासनाचे निश्चित केलेले उद्दिष्ट मर्यादा पूर्ण झाल्याने सदरचे भरडधान्य स्विकारता येणार नसल्याचे शासनाने निर्देश प्राप्त असल्याने आपले भरडधान्याचे लॉट एन्ट्री बाकी असल्याने भरडधान्य मक्का आपणास परत करण्यात येत आहे, असे कळवून विकलेले धान्य परत नेण्यास सांगण्यात आले आहे.शासनाच्या या बेभरवसा धोरणाचा शेतकऱ्यांना जबर धक्का बसला असून या प्रकाराचा शेतकरी कामगार पक्षातर्फे निषेध करण्यात आहे आहे.

शेतकरी कामगार पक्षातर्फे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पाठवलेल्या पत्रात भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, शासनाने मका व ज्वारी खरेदी बाबत १९ सप्टेंबरच्या पत्रानुसार घेतलेल्या भुमिकेमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकांनी राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना केवळ केंद्र सरकारच्या NeML चे पोर्टल वर लाॅट एन्ट्री न झाल्याचे कारण देवून शासनाने खरेदी केलेला मका व ज्वारी, शेतकऱ्यांनी आपल्या घरी परत न्यावे असे आदेश दिलेले आहेत.

आधीच लाॅकडावूनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि शासनाला धान्य विकून पैशांसाठी खरेदी केंद्राचे उंबरठे झिजवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हि बाब अत्यंत क्लेषकारक असून भुमिकेला तात्काळ स्थगिती देवून आपण राज्य सरकार या नात्याने याबाबत केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे भक्कम पाठपुरावा करावा किंवा राज्य सरकारने स्वत: सदर NeML चे पोर्टल वर लाॅट एन्ट्री न झाल्याचे कारण देवून शासनाने खरेदी केलेला मका व ज्वारी शेतकऱ्यांना परत न करता सदर भरडधान्याची बिल रक्कम तातडीने अदा करुन संबंधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणीही भाई रामदास जराते यांनी केली आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *