कोट्यवधींच्या निधी मंजूरी नंतरही नळयोजना कशी काय रखडली ?

शेकाप नेते, माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांचा सवाल

रोहा, रायगड (२८ ऑक्टोबर): धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यामुळे कुंडलिकेच्या दोन्ही तीरावरील गावांचे पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने २६ गावातील नागरिकांसाठी नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचावे यासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भाई पंडित पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच निधी मंजूर करूनदेखील अद्याप कामाला सुरुवात का नाही, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार भाई पंडीत पाटील यांनी उपस्थित केला असून येत्या १५ दिवसात सदर कामाला सुरुवात झाली नाही तर शेकापकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच काम पूर्ण होईपर्यंत संबंधित गावांना सध्या उपलब्ध योजनेतून पाणीपुरवठा करण्याची मागणी देखील पंडीतशेट पाटील यांनी केली आहे.

सन २००७ मध्ये या योजनेचे भूमिपूजन तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु त्यानंतर कामाला गती मिळाली नव्हती. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील यांनी सातत्याने या योजनेच्या पूर्ततेसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून योजना पूर्ण करण्यासाठी निधी प्राप्त करून घेतला. २०१५ मध्ये या योजनेतून पाणी पुरवठा सुरू झाला. काही काळ उत्तमरीत्या चालू असलेल्या या योजनेला पाणी चोरीचे ग्रहण लागले. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाणी चोरीमुळे बहुतांश गावांना पाणी पुरवठा बंद झाला. अनधिकृत पाणी कनेक्शन तोडण्यात यावे, समज देऊन देखील पाणी चोरी होत असेल तर गुन्हे दाखल करा, पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचण्यासाठी अतिरिक्त निधी मिळावा यासाठी १८ जानेवारी २०१८ रोजी २६ गावातील नागरिकांचा हंडा मोर्चा शेकाप नेते पंडीतशेट पाटील, भाई धैर्यशील पाटील, आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वात रोहा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चाची दखल घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पंडित पाटील तसेच संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन रोहा तालुक्यातील २६ गावांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी ५.५० कोटी रुपयांचा निधी विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजूर केला.या गोष्टीला सहा महिने उलटूनही अद्याप या कामाला सुरुवात न झाल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे.

केवळ मिटींगा घेऊन हा प्रश्‍न सुटणार नाही.बेकायदेशीर नळ कनेक्शन तातडीने तोडण्यात यावीत.वाढीव योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी पंडीतशेट पाटील यांनी केली असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेकाप नेते पंडितशेट पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान २६ गावातील पाणी प्रश्‍न सोडविल्याच्या भूलथापा मारणार्‍या इतर पक्षातील नेते मंडळींनी निवडणुकीनंतर येथील जनतेच्या प्रश्‍नबाबत ब्र देखील काढत नसल्याने शेतकरी कामगार पक्ष वगळता अन्य पक्षांनी येथील जनतेला वार्‍यावर सोडले असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *