स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने राबवा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई (६ नोव्हेंबर): कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्थितीत स्थगिती दिलेल्या आदेशाला झालेला दिर्घ काळ लक्षात घेऊन व नव्याने उमेदवारीस इच्छुकांची संधी हिरावली जावू नये यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भाई जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,महानगर पालिका, नवी मुंबई, औरंगाबाद व वसई विरार , ९ नगर परिषद – नगर पंचायती व पोटनिवडणुका, जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या ( भंडारा व गोंदिया ) आणि १५७० ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम व सुमारे १२०१५ ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना कार्यक्रम सुरू होता. मात्र कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महानगर पालिका, नगर परिषदा – नगर पंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रास्तावित असणाऱ्या निवडणूका १७ मार्च रोजीच्या आदेशानुसार आहे त्या टप्प्यावर स्थगित करुन ३ महिण्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या व पुढिल ३ महिने कोणत्याही निवडणूका न घेण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.

सदर प्रकरणी आजरोजी ७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटून गेलेला आहे.उमेदवारी दाखल केलेल्या अनेकांना कोविड १९ मुळे निवडणूक प्रक्रियेस विलंब झाल्याने ते चिंताग्रस्त आहेत तसेच कित्येक नवमतदार वयोमर्यादेने उमेवारीस पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे सदर प्रकरणी झालेला दिर्घ काळ लक्षात घेऊन व नव्याने उमेदवारीस इच्छुकांची संधी हिरावली जावू नये यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात येण्याची गरज असल्याचेही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *